असाच एक स्फोट काही दिवस औरंगाबाद शहरात अनुभवायला मिळाला. ती डांबरी फटाक्यातली माळ नव्हती. तो विजांचा लखलखाट होता. अप्रतिम मिडिया न्यूज नेटवर्क आयोजित महाराष्ट्राचा अप्रतिम महावक्ता ही स्पर्धा अनुभवायला मिळाली. ही स्पर्धा म्हणजे सरकारचा confidential रिपोर्ट होता. महान वक्त्यांच्या परंपरेला मानाचा मुजरा करत, सामाजिक, ऐतिहासिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक अशा एकूण ३० विषयांवर तरुणाई बोलती झाली. जात, धर्म, (बोली) भाषा, पंथ, व्यवसाय, वैचारिक बैठक आर्थिक स्थिती केंव्हाच मागे पडले. खानदेश, विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण अशा अनेक प्रांतांतून तरुण एकत्र आले. सगळी खदखद बाहेर पडली. यात मग गडचिरोली मध्ये वकिली व्यवसाय करणाऱ्या कविता मोहरकर असोत किंवा शिवचरित्रावर ओघवती व्याख्याने देणारा अफसर शेख असो, बाळासाहेब भारदेंचा वारसा सांगणारा सचिन पवार असो किंवा मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेत शिरणारे प्रदीप कांबळे असोत. एक एक हिरा अस्सल होता. महाराष्ट्रातल्या अनेक चळवळींचे वास्तव कळले. अनेक मुद्द्यांचा फोलपणा कळला. उभ्या महाराष्ट्राला शिवछत्रपती किती प्यारे आहेत हे तर समजलेच. पण त्याच्या खालोखाल उभा आडवा महाराष्ट्र बाबासाहेब पुरंदरे यांच्याबद्दल किती हळवा आहे आणि आत्मीयता राखून आहे हेही नव्याने समजले. (संत साहित्य कळले म्हणजे कोणी पांडुरंग होत नसतो, तसेच इतिहास वाचायला लागले म्हणजे पुरंदरे होता येत नाही). महाराष्ट्र म्हणजे कोणी भरकटलेली गर्दी नव्हे तर एक जिवंत विचारधन आहे. मुंबईसारख्या शहरात राहून ग्रामीण भागाबद्दल फार थोडी माहिती कळते. शेतकरी आत्महत्या करतात म्हणून गळा काढणारे अनेक विचारवंत असतात. पण जीवन पिसाळ नावाचा एक १८ वर्षांचा मुलगा शेतकऱ्यांनाच खडे बोल सुनावून गेला. अस्सल ग्रामीण ढंगात त्यांच्यातलाच एक जण त्यांना बोलतोय हे पाहून महात्मा फुल्यांचीच आठवण झाली. स्पर्धकांमध्ये वारकरी समुदायातले एक अनुयायीसुद्धा होते. स्वतः शेतकरी असल्याने त्यांनी कैफियती मांडल्याच. पण त्यावर तोडगेही सुचवले. या एकंदर विचार मंथनात शेतकऱ्याचा आसूड होता, रानातल्या कविता होत्या, मृदगंध होता, कळ्यांचे निश्वास होते, असंतोषाचे इंधन होते, तरुणाईच्या नावोन्मेशाचा हा जाहीरनामा होता. ‘भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बरबाद झाली’, हा प्रत्येकाचाच दृष्टीकोण होता. या महाराष्ट्राचे नशीब असे की तरुणाई असंतोषाला विचारांतून आणि वक्तृत्वातून वाट मोकळी करून देत्ये. याचाच अर्थ कुठेतरी अजून त्यांचा लोकशाहीवर विश्वास आहे. महाराष्ट्राचा विकास समतोल नाही. प्रगतीची केवळ बेटं तयार झालेली दिसतायत. २०२० साली भारतात जगात सर्वाधिक क्रयशक्ती असेल असेल हे मान्य. पण त्यांचा उपयोग झाला नाही तर हेच तरुण काय करतील याचा विचारही करवत नाही. क्रांतीचा मार्ग बंदुकीच्या नळीतूनच जातो हे तत्वज्ञान भारतभरात रुजतंय. अशा वेळी जर असे विचारमंथन होत असेल तर त्याचे स्वागतच करायले हवे. या लेखाच्या माध्यमातून माझी ही विनंती आहे की हा विचारांचा यज्ञ जर पुढे जाणार असेल तर त्याला माध्यमांनीही पाठींबा द्यावा. न जाणो यातून महाराष्ट्राच्या राजकारणाला आणि समाजकरणालाही नवी विधायक दिशा मिळेल.
Wednesday, June 8, 2011
औरंगाबाद शहरात विचारमंथन
औरंगाबाद शहरात विचारमंथन
११ कोटी लोकसंख्येच्या महाराष्ट्रात ७ कोटी लोकसंख्या पस्तिशीच्या आतली असेल. सुमारे साडे पाच कोटी लोकसंख्या तर पंचविशीत आहे. या सात कोटींपैकी किमान ३ कोटी लोकांना आकांक्षा असतील. त्यांच्या सरकारकडून काही अपेक्षाही असतील. आणि जर सरकार त्यांच्या अपेक्षांना उतरत नसेल तर? तरुणाईचा स्फोट विविध मार्गांनी होणे स्वाभाविक आहे.
Subscribe to:
Posts (Atom)