विचारसरणी म्हणजे जगण्यासाठी विचार करण्याची पद्धत मानायला हरकत नाही. कार्ल मार्क्सची विचारसरणी १९९१ साली जगातल्या अनेक देशांनी त्यागली. अमेरिकेने अंगिकारलेल्या भांडवलशाही विचारसरणी मागे जग गेलं. त्याच बरोबर अमेरिकेच्या पुढाकाराने सुरु झालेल्या जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी सारख्या संघटनांनी अनेक देशांना उभा राहण्यासाठी हातभार लावला. विज्ञान तंत्रज्ञानाने घेतलेली झेप तर थक्क करणारी आहे. पूर्वी १९९२ साली बुक केलेला फोन १९९५ साली मिळत असे. आता दुपारी मनात आलं की मोबाईल संध्याकाळी हातात येतो. यासाठी अनेकांनी मनापासून केलेले श्रम आपल्या कमी आले आहेत यात वादच नाही. आपलं जीवनमान उंचवायला भांडवलवाद कमी आलं यात तर वादच नाही. म्हणजेच आपल्याला हवा तो जीवन दर्जा देण्यात मार्क्सवाद कमी पडला.
मार्क्स कसा संपला हे सांगण्यासाठी चेकाळून चेकाळून चीनचा दाखला दिला जातो. गरज आहे ती चीनने काय केला ते समजून घ्यायची.
संपत्ती आकाशातून पडत नसते. तिच्यासाठी हाताला काम लागतं. यासाठी लागतात ते उद्योगधंदे आणि त्यासाठी लागते ती गुंतवणूक. १४० कोटी लोकांचा देश चालवणाऱ्या व अनेकांना पोसणाऱ्या सरकारने उद्योगधंद्यांमध्ये गुंतवणूक करत बसलेला फार चांगलं लक्षण नाही. गुंतवणूक, रोजगार व त्याद्वारे उत्पादकता वाढविण्याची जबाबदारी उद्योगापतींचीच असते. पण त्यासाठी त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर पैसा उपलब्ध असेल याची शाश्वती नाही. म्हणून बाहेरून गुंतवणूक होणार असेल तर ती अव्हेरणे हे व्यावहारिक शहाणपण नाही. चीनने हे दाखवले. आणि पाठोपाठ भारताने. त्यामुळे संपत्तीचे समान वाटप करण्याची संधी मिळेल. कदाचित काही लोकांना अधिक पैसाही मिळेल. परंतु सर्वच गरीब राहण्यापेक्षा ही व्यवस्था परवडली.
आजच्या जगात मार्क्स असतं तर त्यानेही त्याचे घोडे पुढे दामटवले असते का? १८१८ साली मार्क्सने दास कापितल हा ग्रंथ लिहिला. त्यानंतर त्याच्या मृत्यूपर्यंत त्याने स्वत:च अनेक बदल त्यात केले. "मी मार्क्सिस्ट नाही" हे मार्क्स स्वत:च म्हणून गेलं होता. मार्क्सच्या अनुयायांनी मात्र बहुतांशी एकतर त्याचे अंधानुकरण तरी केले किंवा स्वत:ला त्याच्या पुढे समजत प्रत्येक ठिकाणी त्याचे तत्व नको तसे राबवले. (उदा. स्त्रियांबद्दल मार्क्सने एक चकार शब्द काढलेला नाही. आणि तरी मार्क्सवादी स्त्रीवाद निपजला आणि नवरा व सासर ही 'पुरुषप्रधान व्यवस्था' फेकून द्या हे सांगत सुटला) विचारसरणी च्या गाभ्यापेक्षाही ज्या शब्दात ती मांडली गेली आहे तो शब्द जास्त महत्वाचा ठरला की ती घुसमटते. तिचा विकास थांबतो आणि तिची अवस्था अनेक दिवस सडवत ठेवलेल्या कोथिंबीर जुड्ग्यासारखी होते. खाणं तर सोडाच वासही नको. हीच पोथीनिष्ठा मार्क्सावादाला महागात पडली.
मार्क्सवाद आजच्या जगातून खरोखरीच संपला काय? याचा शोध ज्याने त्याने घ्यावा. जेथे जेथे संपत्ती आहे तेथे तेथे शोषण आहे. ज्ञानोबांनी 'दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो' असे म्हटले त्यापेक्षा मार्क्स काहीच वेगळं सांगत नव्हता. शिवरायांनी रयतेच राज्य उभारलं ते काही तत्कालीन राज्यव्यवस्था बहुजन हिताय बहुजनसुखाय होती म्हणून नव्हे. संस्कृती धर्म यांची इमारत शाळा महाविद्यालयातून मजबूत केली जाते. आणि शोषणाला पुढे अधिक वाव मिळतो हे तर सर्व धर्मातलं जागतिक सत्य आहे. मार्क्स वेगळं काय म्हणाला? "पुढे पुढे विविध माध्यमांतून ही इमारत इतकी मजबूत बनते की ती पायाभूत समाजाला जेंव्हा शोषत असते तेंव्हा समाजाला त्याची जाणीवही राहात नसते कारण समाज त्यात आनंदी असतो" असं मत ग्राम्शीने मांडलं. तूरडाळ १०० रुपये किलोने घेऊन आपण घाई घाईने दिल्ली डेअरडेव्हिल्स विरुद्ध पंजाब किंग्स इलेव्हन बघायला बसतो तेंव्हा आपलंही हेच होत असतं. आणि यामुळेच मध्यमवर्गीय समाजातली क्रांतीची संकल्पना नाहीशी होते. आपल्याकडेही हेच झालंय. (जन लोकपाल आंदोलन म्हणजे क्रांती नव्हती). सतत TV वर चाल्णाऱ्या मालिका बघितल्या की हेच जाणवेल. मग तरुणांचे जत्थेच्या जत्थे उभे राहतात नक्षलवादाच्या रूपाने व्यवस्थेला आव्हान देतात. मार्क्स असंच काहीतरी म्हणाला होता. 'मार्क्सिझम' चा दुस्वास करणारा युरोप (जर्मनी, फ्रांस, ब्रिटन वगळता) भिकेला का लागला? अमेरिकेला घरघर का लागली? याची उत्तरं या भांडवलदारांकडे आहेत का? याची उत्तर कोणाकडेच नाहीत. कारण या दोन्हीकडच्या पतनाला (अनुक्रमे १९९१ आणि २००८ पासून पुढे) तेंव्हाची व्यवस्था आणि त्यातली माणसेच जबाबदार आहेत. अति विचारसरणी आणि तिच्या आहारी जाणे जितके वाईट तितकेच शून्य विचारसरणी असणेही वाईट. नक्षलवादाचे आव्हान तर भयाण आहेच पण त्याच बरोबर समाजाच्या पुढचे आव्हानही मोठे आहे. नक्षलवादाला पोलीस आणि लष्कर बघून घेतील. आपल्याला कोण वाचवणार? ममता बाईंकडे याची उत्तरं नसणारच.