Sunday, May 8, 2011

यु पी एस सी चे बदललेले स्वरूप : चर्चा आणि वस्तुस्थिती:

यु पी एस सी चे बदललेले स्वरूप : चर्चा आणि वस्तुस्थिती:

म्हणता म्हणता केंद्रीय लोकसेवा आयोगाने आपले बदललेले स्वरूप लोकांसमोर आणलेच. अपेक्षेप्रमाणे पहिला वैकल्पिक विषयाचा पेपर गेला. आता आयोगाने सामान्य ज्ञानाचा पेपर कायम ठेऊन एक बुद्धिमत्ता चाचणीसारखा नवीन प्रकार आणला आहे. भारत सरकारच्या निर्णयाप्रमाणे जून २०११ च्या परीक्षेत प्रश्नपत्रिकेचे स्वरूप आता बदललेले असेल. पैकी पहिल्या प्रश्नपत्रिकेबद्दल बरेचसे लिहून वाचून बोलून झाले असेलच. सामन्यात: येणारे दरवर्षीसारखे प्रश्न यंदा येतील असेल म्हणायला हरकत नाही. दुसऱ्या प्रश्नपत्रिकेत २०० वस्तुनिष्ठ प्रश्नांना २०० गुण आहेत व याला वेळ आहे २ तास.


प्रश्नपत्रिकेचा हा दुसरा भाग म्हणजे तितकीच महत्वाची मेख आहे. विद्यार्थ्याच्या केवळ तयारीची नव्हे तर एकूणच वकूबाची परीक्षा पाहणारी ही नवी पद्धती असेल. सर्वात महत्वाची बाब विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावी की आयोगाला कधीच कोणी गृहीत धरलेले चालत नाही. परीक्षेची एखादी पद्धत ठरून गेली की तिचा पायंडा पडून राहतो. ती पास होण्याचे ठाकतोळेही ठरून जातात. प्रक्रियेतले नाविन्य संपते. तोच तोच पणा येतो. आणि कोण परीक्षा पास होणार याची गृहीतकेही ठरून जातात (आणि बऱ्याचदा ती बरोबरही ठरतात) नेमके हेच आयोगाला टाळायचे होते. एकाच प्रकारे जर परीक्षा पास होता येत असेल तर निवड झालेले अधिकारीसुद्धा एकाच तऱ्हेचे असण्याचा धोका असतो.

यु पी एस सी ची चाचणी अथवा पूर्व परीक्षा ही गाळणी स्वरुपाची असते. आयोगाच्याच शब्दात स्पष्ट सांगायचं तर जे विद्यार्थी अत्यंत गांभीर्याने तयारी करून परीख देतात त्यांच्याचसाठी परीक्षेचा पुढील टप्पा असतो. यात जिंकू किंवा मारू अशीच वृत्ती हवी. शत्रू कोण आहे हे माहित नसेल तर तो कोणीही असेल हे गृहीत धरायला हवे. तो कुठून वार करेल हे कळत नसेल तर कुठूनही करेल हे माहित असायला हवे, त्याच्याकडे शस्त्रास्त्रे कोणती हे ठाऊक नसेल तर जास्तीत जास्त संहारक असू शकतात हे ध्यानात घ्यायला हवे. त्यांचा डावपेच कोणता असेल हे आपण जाणत नसू तर तो वाटेल तो डाव खेळू शकतो हे आपल्याला कळायला हवे. म्हणजेच ही पूर्व परीक्षा पास होणे म्हणजे येऱ्यागबाळ्याचे काम नोहे, तेथे पाहिजे जातीचे हे प्रत्येकाने लक्षात ठेवायला हवे. हे युद्ध आहे आणि युद्धात सारं काही क्षम्य असतं.

या सर्व बाबी गृहीत धरून आयोगाने परीक्षेत बदल केले आहेत. केवळ सामान्य ज्ञानात नव्हे तर भाषेच्या ज्ञानात व ज्ञानाच्या भाषेत (इंग्रजी) विद्यार्थी किती प्रवीण आहे हे आता बघितले जाणार आहे. तर मित्रांनो आता तयार राहा एका नव्या आवाहनासाठी, नव्हे, एका नव्या विजयासाठी.

यु पी एस सी चा दुसरा पेपर अनेक अंगांनी अधिकारी बनण्याची क्षमता बघतो असे मानावे लागेल. यात इंग्रजी गणित बुद्धिमत्ता चाचणी तर्क व निर्णय क्षमता यासारख्या घटकांचा समावेश होतो. आपण प्रथम संपूर्ण प्रश्नपत्रिकेचा आढावा घेऊ.

पहिला घटक आहे उताऱ्यावरून प्रश्नोत्तराचा. शाळेच्या जीवनात आपण यांचा अभ्यास केलेला असतो. उतारे मोठे असू शकतात. यात विविध विषय हाताळले जाऊ शकतात. उदा: दोन व्यक्तींमधले संभाषण, वर्तमानपत्रातला एखादा परिच्छेद इत्यादी. उतारे मोठे आहेत म्हणून वेळ अर्थातच वाढवून मिळत नाही. मोठ्यातले मोठे उतारे अतिशय वेगाने वाचून काढले जायला हवेत. यासाठी भाषेवरील जबरदस्त हुकुमातीचा केंव्हाही फायदा जास्तच. कारण त्यामुळेच तर मोठ मोठाले उतारे चुटकी सरशी वाचून त्यांचे उत्तम आकलन होऊ शकते. यामुळे वेळाही वाचतो आणि आत्मविश्वासही वाढतो. हे उतारे इंग्रजी अथवा हिंदीत असतील.
दिलेल्या प्रश्नांची उत्तरे कमीत कमी वेळात द्यावी लागतात. यात वस्तुनिष्ठ प्रकारचे प्रश्न असतात त्यामुळे लिहित बसायची गरज नाही. दिलेल्या ४ पर्यायांमधून १ योग्य पर्याय निवडावा लागतो. सरतेशेवटी जवळपास सर्वच उताऱ्यांमध्ये त्यास साजेसं नावही विचारला जातं.

प्रश्नपत्रिकेतला दुसरा भाग असणार आहे व्यक्तिगत संवाद कौशल्याचा. प्रामुख्याने यात येतील ती व्याकरण निगडीत प्रश्नोत्तरे. अचूक ठिकाणी योग्य शब्द घालणे, दिलेल्या वाक्यातला चुकीचा शब्द ओळखणे, योग्य शब्दाला आणखी एखादा अचूक पर्याय देणे, व्याकरणातली चूक शोधून काढणे, योग्य संवाद निवडणे, शब्दाची योग्य जात जिथल्या तेथे लावणे, भूत भविष्य वर्तमान यातल्या चुका ओळखणे अथवा वाक्याचा रोख तसा करणे या महत्वाच्या गोष्टी यात येतील.

तिसरा भाग असेल तार्किक व विश्लेषणात्मक बुद्धीचा. हा भाग आपले बुद्धिमापन करीत असतो. दिलेल्या प्रश्नांचे अचूक उत्तर यात अपेक्षित असेल. कोण, काय, कसे, कधी, कोणाला, का, कुठे, या सर्व गोष्टी यात येतात. आपला मेंदू नेहमीच अलर्ट आहे की नाही आपले प्रसंगावधान कसे आहे या बद्दल सर्व प्रश्न असतील. एखादा अत्यंत लहान उतारा अथवा मोठे वाक्य यात येईल वार त्याचे postmortem करणारे प्रश्न विचारले जातील. एकूणच विद्यार्थ्याची आकलनक्षमता, विश्लेषणात्मकता, तर्कक्षमता, विचारक्षमता व निर्णयक्षमता यांचा कस लावणारा हा भाग असेल हे वेगळे सांगायला नकोच.

चौथा भाग आहे निर्णयक्षमता व समस्या सोडविण्याच्या ताकदीचा. चांगला अधिकारी हवा तर तो तडफेने निर्णय घेणारा हवा. कठीण काळातही डोकं शांत ठेऊन आपल्या तर्काला व विवेकाला स्मरून निर्णय घेणारा हवा. आणीबाणीच्या कळत तर त्याच्यावर सगळी जबाबदारी असते. लहान वयात अधिकार हातात आल्यावर त्यासाठी तो सक्षम आहे की नाही हेही यातून बघितले जाईल.

पाचवा भाग असेल सामान्य बुद्धिमापन क्षमतेची कसोटी बघणारा. हा भाग गणितावर आधारित असेल. काळ, काम, वेगाची गणिते, वये, भूमिती व त्यांवर आधारित प्रश्न, बीजगणित, probability, द्युतातल्या सोंगट्यावर आधारित गणिते, भूमितीय आकारांचे आकलन व त्याची अचूक उत्तरे यात असतील. ज्याला गणितात गती आहे त्याच्यासाठीही हा भाग आव्हानात्मक असतो. गणितात ज्याला गती तो हुशार गणला जातो (ते योग्य की अयोग्य हे ठरविण्याची ही जागं नव्हे) त्यामुळे या भागाशिवाय कोणतीही स्पर्धात्मक परीक्षा पूर्ण होत नाही हे ध्यानात येईल.

सहावा भाग असेल आकड्याच्या खेळाचा. आकडे, त्याचे एकमेकांशी संबंध, त्याची क्रमवारी इत्यादी यात येईल. हा सर्व भाग १० वी NCERT पातळीचा असेल. यातच पुढे माहितीचे संकलन, त्यावरून विचारले जाणारे प्रश्ना यात येतील. अधिकारी होण्यासाठी या सर्वांची माहिती असणे अत्यंत आवशयक आहे. आलेख, स्तंभालेख, वर्तुळालेख , कोष्टके, व त्याप्रमाणे त्याची उत्तरे देणे तसेच अचूक आलेखांची निवड हे सर्व यात येईल. हा सर्व भाग १० वी NCERT पातळीचा असेल.

शेवटचा भाग इंग्रजी उताऱ्याच्या आकलनाचा असेल. पूर्वपरीक्षा हिंदी अथवा इंग्रजीत देता येते हे तर आपणास माहित आहेच. मात्र हा भाग केवळ इंग्रजीत असेल वयात पर्याय केवळ इंग्रजीत असतील. इंग्रजी उताऱ्याच्या आकलनाचा हा भाग १० वी NCERT पातळीचा असेल. याचे भाषांतर उपलब्ध करून दिले जाणार नाही.

आपण जरी हे भाग १ ते ७ क्रमांकाने पहिले तरी ते आपल्या सोयीसाठी होते हे लक्षात घ्यावे. परीक्षेत हे असेच येतील याची हमी नाही. त्यांचा क्रम व संख्या ठरविण्याचा अधिकार केंद्रीय लोकसेवा आयोगाचा आहे. सात भाग असले तरी प्रत्येक भागात अमुक मार्क मिळाले तरच पास होता येईल असे विभागीय अर्हता धोरण आयोगाचे नाही. तसेच विद्यार्थ्याला उत्तीर्ण करण्याचा अधिकार सर्वार्थाने आयोगाकडे आहे.

एकूणच आपल्यासमोर एक चक्रव्यूह मांडला गेला आहे याची आपल्याला कल्पना आली असेलच. आता चक्रव्युहात शिरायचे आहेच पण तो भेदण्यासाठी हे प्रत्येकाने ध्यानात धरावे. आपली क्षमता जोखावी, आपला कल जोखावा व कौशल्य तपासावे. माझा सहकारी गणित उत्तम सोडवतो म्हणून मी गणितांना प्रथम हात घालावा हे धोरण आत्मघातकी आहे. प्रत्येकाची स्वत:ची खास क्षमत असते व तीच त्याची ओळख असते. त्याप्रमाणे प्रत्येकाने स्वत:ला घडवायला हवे. प्रत्येकाचा मार्ग निराळा आहे.

सर्वसामान्य गोष्टी म्हणजे वेळेचे नियोजन, उत्तम मेहनत, मानसिक तयारी, अभ्यासाचे उत्तम साहित्य, आणि प्रश्न साद्वायचा सर्व. या सर्वांबद्दल पुढच्या वेळेस.

No comments:

Post a Comment