Sunday, April 8, 2012
पोथीनिष्ठ विरुद्ध अविचारी
Saturday, March 10, 2012
असे नरेंद्र कुमार आता चिरडलेच जाणार.
असे नरेंद्र कुमार आता चिरडलेच जाणार.
भारतीय लोकशाही चिरडली गेली. युवाशक्ती चिरडली गेली. सरकारी आब चिरडला गेला. आता हे असाच होत राहणार. सिनेमात जसे पोलीस अधिकारी किड्या मुंगीप्रमाणे मारले गेलेत तसे आता प्रत्यक्षातही मारले जाणार. आता या गोष्टी सणासुदीला होतायत. पुढे राजरोस होणार. कोणत्या तोंडाने बरोबरच्यांना आणि पुढच्या पिढीला सांगू की अन्यायाविरुद्ध उभा रहा? का म्हणून कोणाला सांगायचं की कर्तव्याचा पालन कर? निर्भयतेने आणि सक्षमपणे जगायचं असता हे का म्हणून लोकांना बोलत बसायचं? हे असं चिरडल जायला? खाण माफियांनी नरेंद्र कुमार या IPS अधिकाऱ्याला ट्रॅक्टरखाली चिणून मारले. त्याचे गंभीर पडसाद उमटू लागले आहेत. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी या घटनेच्या न्यायालयीन चैकाशीचे आदेश दिले आहेत. नरेंद्र कुमार यांच्या मात्यापित्यांनी सी बी आय चौकशीची मागणी केली आहे. पोलिसांनी यामागे खाण माफिया असण्याची शक्यता फेटाळली. प्रत्यक्षात 2009 चे आयपीएस नरेंद्रकुमार यांची एक महिन्यापूर्वीच मुरेना जिल्ह्यातील बानमोर येथे बदली करण्यात आली होती. या अल्पकाळात त्यांनी अवैध खाणकामप्रकरणी 20 हून अधिक गुन्हे दाखल केले होते. त्यामुळे खाणमाफियांसाठी नरेंद्रकुमार डोकेदुखी ठरले होते. त्यामुळे त्यांच्या हत्येचा कट आखला गेला असावा, अशी शक्यता वर्तवली जात आहे. आहे. जरा अल्प बुद्धीला ताण देऊन बघूया. शैलेंद्र दुबे यांच्या प्रकरणातही असंच झालं होतं. राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पावर बिहारमध्ये काम करणारा हा आयआयटीचा इंजिनियर तरूण कंत्राटदार, नोकरशहा व राजकारणी यांच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात उभा राहिला आणि आपलो प्राण गमावून बसला. ही घटना 2003 साली घडली, तेव्हा केंद्रात वाजपेयी सरकार होतं. खूप ओरड झाली. कडक चौकशीचे आदेश दिले गेले. सीबीआय चौकशी झाली. अखेर दोघा-तिघा जणांना शिक्षा झाली. पण ती होती, दुबे यांच्यावर चोरीसाठी हल्ल्या केल्याबद्दल. कंत्राटदार, नोकरशह व राजकारणी बिनबोभाट मोकळेच राहिले.म्हणूनच नरेंद्र कुमार यांच्या प्रकरणात तेच होणार आहे.
अगदी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी कडक कारवाईचे आदेश देऊनही.कारण चौहान यांना खरोखरच कडक कारवाई करायची असती, तर त्यांनी प्रथम तिथले जिल्हाधिकारी व पोलिस अधिक्षक यांना ताबडतोब जाब विचारला असता. जिल्हयात खुलेआम अवैध खाणकाम होत असताना (इतके की त्यात एखाद्याIPS अधिकाऱ्याला थेट लक्ष घालून कारवाई करावी वाटेल) , ती या अधिकाऱ्यांना माहीत नसेल, हे शक्यच नाही. या माफिया टोळयांवर ज्यांचा राजकीय वदरहस्त आहे, अशा नेत्यांची नावं तर जिल्हयात उघडपणं घेतली जात असतात. तेव्हा या नेत्यांची नावं जाहीर करून त्यांच्यावर कारवाईची घोषण मुख्यमंत्र्यांनी केली असती. पण हे झालं नाही.
पण खरी भीती पुढेच आहे. जर ८ -८ अंगरक्षक आणि संपूर्ण युनिफोर्म घालून एखादा अधिकारी अशा कामगिरीवर जातो आणि तरीही त्याची हत्या होत असेल तर हे भयावह आहे. माणसाच्या जीवाचं मोल आपल्याकडे केंव्हाच संपलंय. आत्तापर्यंत थोडाफार वर्दीचा धाक यांना वाटत असेल असं आम्हाला वाटत होतं. पुढे जरी या वार्दीवाल्यान्बद्दल काही बाही ऐकू आला तरी यातले बरेच प्रामाणिक असतात. आणि त्यंनी जरी ठरवलं तरी मोठा फरक पडेल या भ्रमात समाजहोता. पण तो भ्रमही आता दूर झाला. माणसाला मारणं एकवेळ सोपं असतं (योग्य नव्हे सोप्पं). पण वर्दीतल्या वरिष्ठ पोलिसावर बिनदिक्कतपणे ट्रॅक्टर चालवला जाणार असेल तर हा देश हा समाज आता माफियांच्या हातात गेलाय असं खुशाल समजावं. ही मग्रुरी येते कुठून? माणसाला मारायला विकृती लागते हे कबूल. पण मग्रुरीच काय? एका सामान्य ट्रॅक्टरवाल्याला हे करायची हिम्मत दिली कोणी? आणि त्याला पकडल्यावर इतरही अजून मोकळे का? सगळ्यात धक्कादायक म्हणजे प्रशासकीय अधिकाऱ्यानच वर्तुळ अजून पेटून का नाही उठलं? आपल्याकडे यशवंत सोनावणे जळीत कांडानंतर किमान ३०० जणांना तुरुंगात टाकलं गेलं. अनेक प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकजूट दाखवली होती. मध्य प्रदेशमधून अजून काही हालचाल ऐकू का नाही आली? हुतात्मा नरेंद्र कुमार पोलीस दलात जाऊन ३ वर्षेही झाली नाहीत आणि कर्तव्यासाठी जीव देण्याची त्यांच्यावर वेळ आलीये. एखाद्या सीमेवरील सैनिकासारखी ही घटना आहे. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो असं म्हणायचा कारण नाही. कारण शहिदांचा आत्मा कार्य पूर्ण झाल्याशिवाय शांत होत नसतो. पण खरोखरीच त्यांच्या आत्म्याला शांती द्यायची असेल तर त्यासाठी दोन प्रकारं निर्णय घ्यावे लागतील. पहिलं म्हणजे ज्यांच्यावर फौजदार स्वरूपाचे गुन्हे आहेत, त्यांना निवडणूक लढवण्यास पूर्ण प्रतिबंध करावा लागेल. तसा बदल कायद्यात करावा लागेल. निवणूक आयोग् व सर्वोच्च न्यायालयानं हे बदल किमाना सहा सात वर्षांपूर्वी सुचवले आहेत. पण एकही राजकीय पक्ष त्यासाठी तयार नाही; कारण या व्यवस्थेत साऱ्यांचेच हितसंबंध तयार झाले आहेत. आर्थिक हितसंबंधापायी ही योजना नुसती चर्चेतच राहिली आहे.
साहजिकच खाण माफिया टोळयांचं फावत आहे आणि त्याला अभय देणारे पोलिस व सनदी अधिकारी व राजकारणी गब्बर होत गेले आहेत. ...आणि हाच पैसा आमदार वा खासदार खरेदी करण्यासाठी,, निवडणुका लढवण्याकरिता व स्वत:ची करण्यासाठी वापरला जात असतो. साधं महापालिका निवडणुकीनंतरच राजकारण जरी तपासला तरी हे कळेल. माणसाच्या मताला आणि जीवाला किंमत नसेल तर कसली आलीये लोकशाही. आता या खाण माफियांना कंटाळून जर एखादा स्व संरक्षणासाठी बंदूक उचलतो तर त्याला आम्ही नक्षलवादीठरवणार. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री चौहान यांनी कडक कारवाईची भाषा केली यात नवल नाही इतर अधिकारी कडक तपासाची भाषा बोलतात. यातही आश्चर्य नाही. एकदा का काही लोकांना अटक झाली की, त्यांची तोंडं बदं आणि इतर सारे जण सुखनैव आपला धंदा करायला मोकळे
ड्युटीवरचा IAS अधिकारी बिहार मध्ये दगडांनी ठेचून मारला गेलं तो ९० च्या दशकात. त्याला न्याय मिळायला वर्ष लागली १४. तो मिळाल्यानंतर ४ वर्षात वेगवेगळ्या प्रकरणात किमान ५ अधिकारी गमावले (केवळ ज्येष्ठ अधिकारी, इतर पोलीस धरत नाही)
म्हणूनच आता असे नरेंद्र कुमार मरतच राहणार आहेत! ऐकत रहा.
Monday, January 16, 2012
शासकीय मराठीची जन्मकथा
भाषा ही अभिव्यक्तीचे मध्यम असेल तर समर्पक शब्दरचनेशिवाय तिचे हे कार्य पूर्ण होऊच शकणार नाही. ही अभिव्यक्ती आविष्कृत होते ती व्यवसायाप्रमाणे, सामाजिक दर्जाप्रमाणे आणि नातेसम्बंधान्प्रमाणे. उदा: एखाद्या न्यायाधीशाने आपल्या कामकाजात वापरलेली भाषा ही दोन मित्रांच्या एकमेकांमधील भाषेपेक्षा नक्की वेगळी असते. तिचा पोत वेगळा असतो, प्रदेशाप्रमाणे तिचा लहेजा वेगळा असतो आणि कामकाजाप्रमाणे तिचा आबही पूर्णपणे वेगळा.
आपल्याला भाषेचे अनेक पदर बघता येतात त्यातली गोडी अनुभवता येते. केवळ मराठी भाषेच्या बोलींचा अभ्यास करायचं झाल्यास आपल्याला अहिराणी, वऱ्हाडी, डांगी मालवणी, हळ्बी अश्या १ नाही २ नाही तर तब्बल ३९ भाषा अभ्यासता येतात तरीही महाराष्ट्राची मराठी भाषा म्हणून जिचा प्रचार आणि प्रसार केला जातो ती म्हणजे पुण्या मुंबईची म्हणून ओळखली जाणारी मराठी भाषा. ही एक प्रकारची बोलीच. काळाच्या ओघात वेगवेगळ्या कारणांमुळे तिला प्रमाण भाषेचा दर्जा मिळाला आहे सरकारी पातळीवर हिच
.भाषा आता मराठी म्हणून ओळखली जाते. उद्या जर एखाद्या अमराठी व्यक्तीला मराठी शिकावी लागली तर या भाषेचा वापर होतो.
हे झाले भाषेबद्दलचे विवेचन. पण भाषा म्हणजे काही केवळ अक्षरांशी केलेला खेळ नाही तिच्यात वाक्प्रचार असतात. असतात, म्हणी असतात, वेगवेगळे बलाघात समाघात (Accents) असतात. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मोठा शब्दसंग्रह असतो. या सर्वांनी युक्त असूनही ती साचेबद्ध ना होता असते नवनवी वळणे घेत असते. नवे प्रवाह पचवत असते. म्हणूनच ती वर्धिष्णू असते. मराठी भाषाही याला अपवाद नाही.
हाच दृष्टीकोण मनात बाळगून आपल्याला सरकारी भाषेचा अभ्यास करता येईल. शासकीय मराठी थोडी गंभीर वाटते आणि थोडी जडही. पण ती समजायला अडचण काहीच येत नाही फक्त ती सरकारी भाषा असल्यामुळे तिची ठेवण इतरांपेक्षा अलग असते.
शासकीय मराठीचा उगम (शिवकालीन मराठी)
शिवकालीन कालखंड म्हणजे १७ वे शतक. यापूर्वीची मराठी भाषा म्हणजे प्राकृत भाषेचा आविष्कार. या भाषेवर संस्कृत भाषेचा प्रभाव अधिक होता. उदा: चक्र हा शब्द्द. याचा शब्दाची काळाप्रमाणे रूपे बदलली. चक्र -> चक्क -> चाक असं त्याचं प्रवास झाला. संस्कृत ही सामान्य लोकांची भाषा कधीच नव्हती. आजही नाही. पण तरीही आपल्याला संस्कृत वाचताना कुठे तरी काहीतरी कळत असल्याची जाणीव होत असते कारण आपल्याला संस्कृत कुठेतरी जवळची आहे. ज्ञानेश्वरीचे वाचन करताना आपल्याला हा प्रभाव जाणवतो.
दुरितांचे तिमिर जाओ| विश्वस्वधर्म सूर्ये पाहो|
जो जे वांछील तो ते लाहो|प्राणिजात||
हे साहित्य वाचताना आपल्याला धार्मिक साहित्य वाचल्याचा एक अनुभव येतो कारण या भाषेवर संस्कृतचा प्रभाव होता. महानुभाव पंथीय साहित्यात मराठीचा (आग्रहाने व आवर्जून) वापर असेल पण त्याचा व संस्कृतचा संबंध नाकारता येत नाही. नामदेवांच्या आरत्या, एकनाथी भागवत, आणि रघुनाथ पंडितांचे 'नल दमयंती स्वयंवर', तत्कालीन मराठी भाषेची उदाहरणे द्यायला एवढा ऐवज पुरा पडावा.
मराठी भाषेवर असलेला हा संस्कृत भाषेचा पगडा एका टप्प्यावर स्थीर झाला. त्याला जशी नव्याने उदयाला आलेली लोकसंस्कृती कारणीभूत होती तशीच कारणीभूत होती तेंव्हाची नवी राजकीय व्यवस्था.
याच काळात मराठी प्रांतात बहामनी मुसलमानी राजवट स्थिरावली. महाराष्ट्राचा नकाशा ध्यानात घेतला तर अहमदनगर (निजामशहा), गोवळकोंडा (कुतुबशहा), विजापूर (आदिलशहा) यांच्याच बरोबर बिदर, गुलबर्गा येथील राज्येही तितकीच महत्वाची होती. यापैकी निजामाच्या राजवटीत शासकीय भाषा मराठी होती. याचे कारण म्हणजे मराठी ही जनसामान्यांची भाषा होती. आता लोकांमध्ये राज्य टिकवायचे झाल्यास त्यांची भाषा आत्मसात करावीच लागणार आणि त्यांच्याशी काही प्रमाणात तरी जमवून घ्यावेच लागणार. (हेच मुघलांनी ओळखले पण आजचा गद्दाफी ओळखू शकला नाही.) पण मराठी भाषा आत्मसात करून ती कारभारात आणताना राज्यकर्त्यांनी शब्द मात्र सर्रास फारसी वापरले. आणि प्रशासन व लोकांमध्ये संवाद निर्माण होताना हीच भाषा रुजायला सुरवात झाली. (येथे "कोणत्याही काळात जेत्यांचे विचार हेच समाजाचे विचार ठरतात आणि समाज कालांतराने त्यांच्याच भाषेत बोलू लागतो" हा कार्ल मार्क्सचा सिद्धांत लागू पडावा.)
पुढे सर्व राज्यकर्त्यांनी आपली शब्दसंपदा व्यवहारात आणायला सुरुवात केली व लोकांनीही त्याला साथ दिली.
तत्कालीन मराठी ही इंडो आर्यन कुळातली भाषा होती. तिचे काही नियम होते. त्यांना धक्का ना लागता मराठी भाषेत नवे शब्द दिसू लागले. मराठीचे मूळ रुपडे बदलले नाही तिचा पोत मात्र बदलायला लागला.
मराठी भाषेत व्याकरणिकदृष्ट्या झालेले बदल आपण समजावून घेऊ.
स्वनीम व्यवस्था: (म्हणजेच आपली सामान्य बाराखडी. स्वन म्हणजे ध्वनी)
फारसी भाषा ही अंतरश्वसित तर मराठी भाषा बहिरश्वसित. म्हणजेच फारसी भाषा बोलताना श्वास रोखून धरावा लागतो. मराठी भाषा बोलताना सोडावा लागतो. नवनवे फारसी शब्द मराठीत दिसू लागले पण ते बहिरश्वसित पद्धतीने. खालील उदाहरणे बोलकी आहेत असे म्हणता येईल.
फारसी भाषा (मूळ शब्द फारसी अर्थासकट) | मराठी भाषा (रुपांतरीत शब्द) | झालेला बदल |
जिक्र (कटकटीचे काम) | जिकीर | उच्चारात बदल |
फिक्र (परवाह) | फिकीर (चिंता- परवा) | उच्चारात बदल |
मुलाकात | मुलाखत भेट | (‘क’ चा ‘ख’ महाप्राण) |
गुनाह | गुन्हा | 'ह' प्रकट स्वरुपात |
गवाही | ग्वाही साक्ष (मूळ अर्थ खात्री) |
|
आणखी काही मूळ शब्द व बदल.
फारसी भाषा (मूळ शब्द) | मराठी भाषा |
झिला | जिल्हा |
शाह | शहा |
सिपाही | शिपाई |
तपसील | तपशील |
जियादा | ज्यादा |
जागीर | जहागीर |
आबरू | अब्रू |
दर्मियान | दरम्यान |
पुंछ्ना | पुसणे (विचारपूस) |
अर्थ प्रक्रियेत काळाच्या ओघात झालेले बदल
शब्द | मूळ अर्थ | सध्याचा अर्थ |
दुकान | पसारा | विक्री केंद्र |
ग्वाही | साक्ष | खात्री |
मराठीत शिरलेले नवे प्रत्यय
प्रत्यय | शब्द |
गिरी | गुलामगिरी, मुलूखगिरी, मुत्सद्देगिरी, गांधीगिरी |
दार | भालदार, चोपदार, दमदार |
ई | दिरंगाई, कुचराई |
गी | दिवानगी, मर्दानगी |
की | पावकी निमकी. |
मराठीत शिरलेल्या या नव्या पर्वामुळे व्याकरण प्रक्रियेला धक्का लागला का?
या प्रश्नाचे उत्तर 'नाही' असे देता येईल.
काही नवीन व्याकरणिक नियम जरूर शिरले पण मौजूद नियमांना धक्का लागला नाही. नवीन प्रत्यय व व्यवस्था आली. किल्ला --इ - पुरंदर याचे किल्ले पुरंदर असे नाव झाले तसेच सालाबादाप्रमाणे म्हणजेच मागील वर्षाप्रमाणे. यात 'साल' च्या मागे 'बाद' येतो आणि मराठीत मात्र 'मागील' हा शब्द 'वर्षा' च्या आगोदर येतो.
त्याचप्रमाणे नवीन आलेल्या शब्दाला लिंग, विभक्ती आणि वचन मिळाले की त्याला त्या भाषेत स्थान मिळते उदा: टेबल. पुल्लिंगी प्रथमा विभक्ती, आणि एकवचन याच गोष्टी सर्व फारसी शब्दांना लागू होतात.
सामान्य रूप हा मराठी भाषेचा चा विशेष आहे. उदा: 'वेळ' या शब्दाला 'त' हा प्रत्यय जोडला की 'वेळेत' हा शब्द होती. या 'वेळ' या शब्दाचे 'वेळे' हे सामान्य रूप होते. तसेच किल्ला आणि किल्ल्याला.
म्हणजेच मराठीचा साज बदलला, तिला दरबारी आब आला पण लहेजा मात्र तसाच राहिला. खऱ्या अर्थाने मराठी भाषा समृद्ध झाली . उपलब्ध शब्दांना अक्षरश: समांतर अशी एक नवी संपदा उभी राहिली
तरीही या सांस्कृतिक संक्रमणाचे काही परिणाम व्हायचे ते झालेच. मराठीचे रूपच पालटले आणि इंडो आर्यन कुळातली मराठी ही परसो आर्यन कुळातली होते आहे की काय अशी भीती निर्माण झाली
या परिस्थितीत बदल करण्यासाठी म्हणून शिवछत्रपतींनी मराठी शब्दकोश प्रकाशित केला. मूळ मराठी भाषेला संजीवनी देण्याचा हा प्रयत्न. आपल्या अष्टप्रधान मंडळाच्या मूळ मराठी नावांबरोबरच त्यांनी फारसी नावेही जोडली.
शिवछत्रपतींचे अष्टप्रधान मंडळ.
पेशवा - | पंतप्रधान |
मझुमदार - | अमात्य |
वाकीया नवीस वाकनीस | (मंत्री ) |
सूर नवीस - | सचिव |
डबीर - | सुमंत |
सरनौबत - | सेनापती |
पंडितराव |
|
न्यायाधीश |
|
पण शिवशाहीच्या उत्तरकाळात हा प्रयत्न मागे पडला राज्य राखणे हीच मोठी जबादारी .पडली. येऊन बाजीरावाचा .पडली. येऊन घोडा तर अक्षरशः पायाला भिंगरी लावल्यासारखा सतत धावत होता भाषा संवर्धनासाठी वेळच मिळाला नाही आणि पुन्हा एकदा मराठी फारसीमय . झाली नाना फडणविसांची पत्रे याची साक्ष देतील. त्या काळची भाषाच मुळी मुन्साफिच्या हुद्द्यावर तुमचा तक्रूर केला आहे (न्यायाधीश पदावर तुमची नियुक्ती केली आहे) अश्या स्वरूपातली झाली. म्हणूनच आजच्या शासकीय मराठीत हे सर्व शब्द सरसकट आढळतात. तरीही आपण सहजपणे शब्दांचा संयोग केला उदा: रोजगार हमी योजना, जिल्हाधिकारी, तसेच नवीन शब्द शोधले. उदा: मंजूर करणे म्हणजेच पारित करणे. शहरप्रमुख म्हणजेच महापौर (हा शब्द सावरकरांचा) वेगवेगळ्या वेळी आपल्याला नवी उत्पत्ती करावी लागली.
आजची शासकीय मराठी (व आपल्याही व्यवहारातली)
फारसी शब्द मूळ मराठी शब्द
(शुरुवात ) सुरुवात | प्रारंभ |
आखिर अखेर | शेवट |
हमी | खात्री |
रोज | प्रतिदिनी. |
तारीख | दिन + अंक = दिनांक |
जबाबदारी | उत्तरदायित्व |
महसूल | राजस्व |
कर्ज | ब्रह्मस्व |
तपास | शोध |
फत्ते | विजय |
हार (शिकस्त) | पराभव |
याद -> यादी | सूची (सुचावे म्हणून केलेली) |
पैदास | उत्पत्ती |
पगार | मानधन |
जरूर | आवश्यक |
नुकसान | हानी |
नफा फायदा | लाभ |
खूब (खूप) | पुष्कळ |
जोर ताकद | बळ |
दर्जा | पातळी |
कायदा | नियम |
इमारत | ----- |
अंदाज | अनुमान |
जकात | सीमा शुल्क |
(खास+गी) खासगी | वैयक्तिक |
कारवाई | कार्यवाही |
सरकार व शासन | राज्यकर्ते |
बाब | गोष्ट |
जमीन | भूमी |
जाहीर | घोषित |
रस्ता | मार्ग |
मराठी भाषेचा हा अवतार आपल्याला प्रामुख्याने पारिभाषिक शब्दांमध्ये दिसून येतो. एरवी आपल्याला संस्कृतप्रचुर मराठी भाषा दिसतेच.
शेवटी एवढेच नमूद करावेसे वाटते की मराठी भाषा श्रीमंत झाली आहे हे नाकारण्यात काहीच अर्थ नाही. आज धर्माच्या नावावर एकमेकांचा तिरस्कार करण्याची वृत्ती वाढली आहे. तेंव्हा हा समाजशास्त्रीय इतिहास डोळ्यासमोर आणल्यास उत्तम. तसेच आजच्या जागतिकीकरणाच्या युगात तर शेकडो शब्द मराठी भाषेत यायला उत्सुक असतील. गरज आहे ती केवळ त्याच्याकडे स्वागतपूर्ण दृष्टीने बघण्याची व त्या योगे या नव्या स्थित्यांतरला सक्षमपणे सामोरे जाण्याची.
संदर्भ सूची
भाषा विज्ञान वर्णनात्मक आणि ऐतिहासिक
भाषा कुल – संकल्पना आणि मराठीचा उद्गम- अंजली सोमण
मराठीचे ऐतिहासिक भाषाशास्त्र र. रा. गोसावी
यादवकालीन मराठी भाषा – शं गो. तुळपुळे
मराठी भाषेचा इतिहास. गं. ना. जोगळेकर
मराठी भाषा उद्गम आणि विकास कु पां कुळकर्णी
मराठी भाषेच्या व्युत्पत्तीचा इतिहास.
ज्यूल ब्लॉक (Paris University)