Tuesday, June 2, 2015

तुज आहे तुजपाशी

एक होता हिमेस, दुसरा होता जीग्नेस. हिमेस अभ्यासात जेमतेम होता. जीग्नेस अभ्यासात लई हुशार. हिमेस वागायला लई बेकार. लोकांनी बरंच सांगितलं सुधार राजा, पण सगळे सल्ले खुंटीला टांगत हिमेस हुंदडत राहिला. त्यातच त्याच्या बापूसने त्याला एक मोटरसायकल घेऊन दिली. हिमेसला आता आकाश ठेंगणं झालं होतं. स्वारी निघाली. दिवस रात्र मित्रांबरोबर भटकणं सुरु झालं. दहावी बारावी हातातून गेली अगदी नापास नाही तरी गर्वाने सांगावे असे मार्क भेटले नाहीत. 'माझा पोऱ्या मार्क्सवादी गटातला नाही' असं म्हणत बापाने सगळं उडवून लावलं. असं करत करत आपला हिमेसभाई पंधरावी पास झाला. जीग्नेस मात्र बडा कबिल छोरा. पुरा एकलव्य. बारावीला झकास स्कोर करायचा, मोठ्या इंजिनियरिंग कॉलेजला जायचं आणि लाइफ मध्ये काहीतरी करून दाखवायचं. माथ्यात जुनून घेऊन जीग्नेस अभ्यास कारायचा. आयआयटी डिग्री हासील करून जीग्नेस आयआयएम अमदावादला (अहमदाबाद) गेला. एक आदर्श छोरा म्हणून आणि एक लंबी रेसचा घोडा म्हणून जीग्नेसने आई वडलांच्या सगळ्या अपेक्षा पूर्ण केल्या. योग्य वयात त्याचं लग्न लागलं. एक मात्र घडलं जीग्नेसला भारताबाहेर जायचं होतं. पण बापाने गळ घातली, एकुलता एक आहेस, आई सुद्धा वयस्कर झालीये, तू गेलास तर मग आमचं कोण? आमचं ऐक बाबा. चिडून, रुसून, फुगून, जीग्नेस भारतातच राहिला. शी, इथे ठेवलंय तरी काय? ती अमेरिका बघा. कुठच्या कुठे पोहोचलीये. मस्त वातावरण, संधी भरपूर, चकाचक श्रीमंती मोठ्या गाड्या आणि बंगले. डॉलर्स मध्ये पगार मिळणार म्हणजे भारतापेक्षा ६० पट जास्त. इथे काय आहे ? ऑक्सिजनपेक्षा लोक जास्त. आयुष्य नाहीच इकडे, घुसमटच जास्त. गर्दी, उकाडा, घाण, करप्शन, जातपात रिझर्वेशन किती किती सांगावं. अरबी सुमुद्राच्या काठावर उभा राहून जीग्नेस 'सागरा प्राण तळमळला' आळवू लागला. मध्ये मध्ये त्याला अमेरिकेला जायचा योग येत राहिला. जबरदस्त पगाराची नोकरी त्याला मिळाली. पण सेटल होणं काही जमलं नाही. आणि मुलगी १२ वर्षांची झाल्यावर त्याने तो नाद सोडून दिला. कसं जायचं, अमेरिकेत काय कल्चर आहे का? ये दुनिया, एक दुल्हन, दुल्हन के माथे की बिंदिया, यह मेरा इंडिया, आय लव्ह माय इंडिया. मधल्या मध्ये नोकरीला लागल्यावर लगेच जीग्नेसने तीन लाखाचा तीन बी एच के ब्लॉक घेतला होता. आज २५ वर्षांनी त्याची किंमत तीन करोड झाली होती. थोडी अजून घरं, बँकेतले फिक्स्ड डीपोझीट, पोस्टातली गुंतवणूक वगैरे जमेल धरून जीग्नेस चांगला स्थिरावला होता. बचत भरपूर खर्च पण भरपूर. आता बाप म्हणून सुद्धा त्याने मुलीचं लग्न धुमधडाक्यात लावलं होतं. शाळेच्या दिवसांपासून आयुष्याचं मिशन केलेल्या जीग्नेसला त्याची गोड फळं मिळाली. हिमेसला पंधरावी पास झाल्यावर बापानं दुकानावर ठेवलं. पाहिलं टार्गेट, एकाची तीन दुकानं करून दाखवायची. धंदा अगदी साधा, टुरिझमचा. हळूहळू टक्के टोणपे खात तो त्यात स्थिरावला. फसवणारे भेटले, आंधळा विश्वास ठेवावा किंवा ठेवणारे असेसुद्धा मिळाले. रात्रंदिवस, सणवार बाजूला ठेवत हिमेसभाई धंद्यावर बसायला लागला. तोडकं मोडकं इंग्लिस आणि बरेच मेनर्स, फोर हिमेस बिजनेस इस बिजनेस. मधल्यामध्ये बापाने एक सवय लावली होती. मुंबईत दलाल स्ट्रीटवर एक शेअर बाजार नावाची इमारत आहे. तिकडेपण कधीतरी चक्कर मारायची. अनुभवातून माणसे शिकता यायला लागली. काही चांगले सल्लागार मिळाले. सल्ला एकाच. आधी बचत आणि मग उरलेला सगळा पैसा खर्च करायचा. हिमेसने हा जुगार मानला नाही. जुगार म्हणजे शॉर्टकटने अधिक पैसे, इथे शॉर्टकट हवाय कोणाला? मला धावायचं नाहीये. पण थांबायचं पण नाहीये. हिमेसभाईने बऱ्यापैकी काटकसरीत दिवस काढले, पण बायको मुलीला काही कमी पडू दिलं नाही. २५ वर्षांपूर्वी धंद्यात अमदानी यायला लागल्यावर नियमित गुंतवणूक सुरु केली. ती होती दोन हजार रुपये. हा अकाउंट त्याने आयुष्यातली पहिली आठवण म्हणून कायम ठेवला. त्या नियमित घातलेल्या दोन हजार रुपयांचे किती झाले असतील? जवळपास साडे तेरा कोटी रुपये. महाराष्ट्रातली एक मोठी टुरिझम कंपनी त्याची आहे. देश विदेशात त्याचा कारोबार आहे. पंधरावी काठावर पास हिमेसने एकच केलं, हाडाची काड करून ढोर मेहनत आणि अपयशाने खचून न जाण्याची वृत्ती बाळगणं. शाळा कॉलेजच्या वयात मार्क कमी पडले म्हणून न त्याला आई बापाने कोसला ना त्याच्या समाजाने आणि नातेवाईकांनी बिनकामाचा ठरवला. १५, १८ आणि २०व्या वर्षी मुलाची जन्मभराची पात्रता ठरवण्याचा अधिकार परीक्षा घेणाऱ्यांना कोणी दिला असा साधा प्रश्न त्याची कमी शिकलेली आई विचारत असे. आपल्या मराठी समाजाला आपल्या आस पास असे अनेक जीग्नेस दिसतील. कोणतंही नाव लावा, जीग्नेसची स्टोरी ही अनेक मराठी मुलांची स्टोरी आहे. खंत आहे ती आपल्या मराठी समाजात हिमेस फार मिळत नाहीत याची. दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा.

1 comment: