Wednesday, June 29, 2016
पृथ्वीराज रासो
महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री आता पृथ्वीराज चव्हाण नसतील. काँग्रेस जिंकली तरी पृथ्वीराज बाबांची पत ढासळली आहे. पृथ्वीराजांची गच्छंती फार चटका लावून जाईल.
वर्गात शिकवताना कायम उत्तम प्रशासक असणाऱ्या मुख्यमंत्र्यांच सामान्य माणसाच्या आयुष्यात स्थान काय यावर बोलताना मी कायम पृथ्वीराजांचा दाखला देतो, त्यानंतर नरेंद्र मोदी, मग शिवराजसिंग चौहान सरतेशेवटी रमणसिंग, फायनली मायावती आणि सुधारित जयललिता. माझ्या अनुभवाशिवाय मी काहीच बोलत लिहित नाही. पृथ्वीराज चव्हाण महाराष्ट्राचे ,मुख्यमंत्री झाले आदर्श सोसायटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर. त्यांच्याबद्दल काय काय ऐकून होतो, सगळं खरं निघालं. दिल्लीला विमानाने जाण्याआधी कराड पुणे गाडी आणि मग तिथून इंद्रायणीने मुंबई असा लांबचा गैरसोयीचा पण सचोटीचा कार्यक्रम. उधळपट्टी कुठेच नाही. भेटूया का लंचला असं कोणी विचारलं की भेटायची जागा म्हणजे मंत्रालयाचं कॅन्टीन. मुख्यमंत्री होण्याआधी पृथ्वीराज चव्हाण हे नाव मराठी वाटू नये इतकी वर्षे ते दिल्लीत होते. थेट महाराष्ट्राचा मुख्यमंत्री केले जाण्याएव्हढी त्यांची जवळीक पक्षश्रेष्ठींशी होती.
निकम्मा हा त्यांच्या सरकारमधल्या विरोधकांचा आवडता शब्द. पतंगराव, नारायणराव हे गुढग्याला बाशिंग बांधून असलेले पक्षातले प्रतिस्पर्धी तर अजित पवार, सुनील तटकरे हे मित्रसदृश्य वैरी असलेल्या पक्षातले सहकारी. सगळ्यांचा भिडू एकच. बिल्डर लॉबी. काही मंत्र्यांची मजल तर मुंबईतल्या मोकळ्या जमिनी विकून राज्यासाठी निधी करायची भाषा करण्यापर्यंत गेलेली. महाराष्ट्रातल्या राजकारणाला असलेल्या शापावर उतारा म्हणून पृथ्विराजांनी पंचाक्षरी मांत्रिकाची भूमका चोख बजावलीच आणि शिवाय त्यांना नियमांचा चाप लावला. कुठे खुट्ट झाले तरी बिल्डरच्या नाकात दम आणणारे अधिकारी अनेक ठिकाणी तयार झाले. नियम चोख हा शब्द पडावा असे राबवले गेले. मोठ्या बिल्डर्स च्या कार्यालयात रोकडीचे व्यवहार बंद झाले. अनेक ठिकाणी अधिकाऱ्याचं डिपार्टमेंटलायझेशन तयार झालं. काही ठिकाणी मंत्र्यांना चाप लावायला विश्वासातले अधिकारी नेमले गेले. हे सगळं कराताना त्यांच्या मागे ना होता एखादा साखर कारखाना महासंघ, ना कोणता दुध उत्पादक संघ ना साधी पतपेढी. कोणतेही पाठबळ नसताना संकटांना अंगावर घेणारे बाबा म्हणूनच वेगळे. धीरगंभीर व्यक्तिमत्व मितभाषी स्वभाव आणि तरीही चेहऱ्यावर आश्वासक हसू. हे सगळं करताना या "लकवाग्रस्त" मुख्यमंत्र्याने चार वर्षात ३६००० हून अधिक फायलींवर सही केली. त्यांना लकवा जडला तो ज्या प्रकल्पांचे भवितव्य ऐकूनच आश्वासक वाटणार नही अश्या बाबींमध्ये. उदा: एखाद्या बिल्डरचा टि डि आर मिळवण्यासाठी २६ माळ्यांचा पार्किग स्लॉट बांधण्याचा प्रस्ताव किंवा समुद्री मार्गाला समांतर उगीचच अजून एक सागरी सेतू वगैरे.
पवार काका पुतण्यांना लगाम घालणारे, मंत्रिमंडळातल्या तथाकथित सहकाऱ्यांना चाप लावणारे बाबा म्हणूनच चर्चेत राहिले. त्यातच त्यांची मुलाखत वादळी ठरली .
मुलाखतीबाबत बाबांनी खेद व्यक्त करायला नको होता. त्यांचे तथाकथित सहकारी आता दंडाच्या बेटकुळ्या दाखवायला लागले आहेत. कोणीही उमेदवार बाबा कसे भ्रष्ट, ह्यावर प्रवचन द्यायला लागलाय. निवडणुकीआधी आणि दरम्यान ही घरंदाज टोळकी व्हे प्रोटीनचे डबे रिकामे करत शक्तिप्रदर्शन करत होती. एम व्हिटामिन ची उधळण आणि वडिलधाऱ्याच्या फोटोंच्या विविध पोजेस हीच यांची संपत्ती. औट घटकेची ही ताकद आता काही तासात ओसरेल. बाबा कसे चुकले हे प्रत्येकजण दाखवेल. बाबा तुम्ही चुकलात. लोकसभेच्या निवडणुकीनंतर कॉंग्रेसच्या मुजोर हायकमांडने संघटनात्मक पुनर्बांधणी केली नाही ही तुमची चूक. बळीचा बकरा करणे ही काँग्रेस ची परंपरा आहे त्यामुळे पृथ्वीबाबा एकाकी पडणार यात शंका नाही. एका उत्तम व्यक्तिमत्वाला महाराष्ट्रातून हाकलण्यात काही काँग्रेस टगे यशस्वी होतील. पृथ्वीराज चव्हाण या मुख्यमंत्र्याचीच नव्हे तर काँग्रेसची सुद्धा ही शोकांतिका ठरेल.
या सगळ्याला आता इलाज नाही. मध्ययुगीन काळात पृथ्वीराज चौहान याच्या बद्दल त्याच्या चांद बरदाई नावाच्या राज कवीने "पृथ्वीराज रासो" नावाचा ग्रंथ लिहिला होता. त्या धर्तीवर, पृथ्वीराज चव्हाण उर्फ पृथ्वीबाबांच्या नावाने चांगभलं.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment