Friday, July 29, 2016
फ्रॉम टिळक टू गांधी
गांधीजी आणि लोकमान्य टिळक यांच्यातल्या नातेसंबंधांबद्दल अनेकांच्या मनात अनेक गैरसमज आहेत. लोकमान्य टिळक त्यांच्याइतका करिष्मा महात्मा गांधींना नव्हता, टिळक अजून दहा वर्षे जगले असते तर स्वातंत्र्य पंधरा वर्षं अगोदर मिळालं असतं, गांधीजी टिळकांच्या तुलनेत अगदीच मवाळ होते, लोकमान्य टिळकांनंतर मराठी माणसाचं भारतीय स्वातंत्र्य लढ्यातलं योगदान नगण्य आहे ही आरोप प्रत्यारोपांची फटाक्यांची माळ जी गांधी समर्थक आणि विरोधकांकडून सुरू होते ती प्रत्येक ब्राहमण हा नथुराम गोडसे असतो इथपर्यन्त येऊन थांबते. सत्य परिस्थिती हीच आहे महात्मा गांधीजी आणि टिळक महाराजांमध्ये तत्वांच्या दृष्टीने काहीच फरक नव्हता. किंबहुना टिळकांनी तत्त्वं आखून दिली आणि गांधीजींनी ती आपल्या पद्धतीने राबवली. टिळकांनी दिशा दिली गांधीजींनी त्यावरून मार्गक्रमणा केली.
इकडे एक मान्य करायला हवं की महात्मा गांधींचा मार्ग अनेकांना आजच्या भाषेत इंझमाम उल हक वाटण्याची शक्यता आहे. सलामीची जोडी कितीही मैदान गाजवून गेली तरी इंझमाम शांतपणे उतरायचा जेमतेम क्रीझ पर्यंत चालत जायचा (इतका जेमतेम की वाटायचं वाटेतच संपून जाईल की काय) आळसावलेला चेहरा, कमीत कमी बॅटची हालचाल आणि सगळ्या सामन्याचा वेग उतरून जायचा. टीव्ही बंद करावासा वाटे. पण इंझमामने अशी वेळ आणली की तो हमखास सामना जिंकून द्यायचा.
'स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे' असं कोणीतरी म्हटल्यावर सत्य, अहिंसा, अस्तेय, अपरिग्रह आणि ब्रह्मचैर्य अशी तत्त्वप्रणाली बाळगणारा नेता अनेकांना (खास करून तरुणांना) अरसपूर्ण वाटला तर त्यांना संशयाचा फायदा तरी दिला जायला हवा.
एक गोष्ट खरी की भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे निर्विवाद नायक मोहनदास करमचंद गांधी आहेत. परंतु त्या स्वातंत्र्य लढ्याचे निर्विवाद 'जनक' लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आहेत. केसरी आणि मराठा ही दोन्ही वृत्तपत्रे हा भारतीय प्रसारमाध्यमांमधला मैलाचा दगड आहे. केसरी मधले जळजळीत भाषेत तितकेच जळजळीत सत्य मांडणारे लेख लोकांमध्ये नेण्याचं काम अनेक तत्कालीन अनुल्लेखित नायिकांनी केलं. समाजची साक्षरता काही टक्केसुद्धा नसताना लोकमान्यांचे अनेक शिष्य ही वर्तमानपत्रे जाहीररीत्या लोकांमध्ये वाचून दाखवत. त्याचवेळी टिळकांचे मराठा या इंग्रजी वृत्तपत्रांमधले लेख ब्रिटिशांवर त्यांच्याच भाषेत प्रहार करत. तो पर्यंत ब्रिटिश साम्राज्यावर टीका झाली नव्हती असं नाही. किंबहुना ब्रिटिश साम्राज्यावर मोठ्या प्रमाणात टीका भाषिक वृत्तपत्रांनी केली होती. त्याचीच परिणीती या वृत्तपत्रांची मुस्कटदाबी करणारा व्हर्नाक्युलर प्रेस ऍक्ट येण्यात झाली होती. परंतु त्याहीपुढे जात टिळकांनी इंग्रजी भाषेत लेख लिहून त्यांना आव्हान द्यायला सुरवात केली. टिळकांचा याबाबतीत अभिमान इतका जाज्वल्य होता की त्याभरात ब्रिटिशांनी आणलेल्या कल्याणकारी कायद्यांनाही त्यांनी विरोध केला. ज्या साम्राज्याला विरोध करायचा त्यांच्या चांगल्या कायद्याचं स्वागत कसं करायचं ? ओव्हरऑल ब्रिटिश नकोत परंतू चांगल्या कायद्यांसाठी मात्र त्यांचं कौतुक करायचं? असा प्रश्न टिळक करीत. (म्हणूनच समाजसुधारक आणि पुरोगामी म्हणवल्या जाणाऱ्या ब्रिगेडी वृत्तीच्या लोकांना टिळकांवर बोलायला तोंड मिळतं). पण आपण हे सुद्धा विसरतो की ब्रिटिशांनी ज्या सुधारणा आणल्या त्या अधिकांश १८५७ च्या आधी आणल्या. नंतर पाटी कोरी असण्याला केवळ तो उठावाच नव्हे तर तात्कालिक भौगोलिक आणि आंतरराष्ट्रीय परिस्थितीसुद्धा जबाबदार होती. १८९३ चा शारदा कायदा ही एकच काय ती महत्वाची सुधारणा त्यानंतर येते. त्यामुळे ब्रिटिश राजवट ही हेतुपुरस्सर कल्याणकारी होती हे सत्य आहे.
लोकमान्य टिळकांचा अभ्यास करता येतो तो स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण आणि बहिष्कार या चतुःसूत्रीसंदर्भात. किंबहुना टिळक एक निव्वळ राजकीय नेते म्हणून समजून घेण्यासाठी ही सुरवात उत्तम आहे.
टिळकांचा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमधला वावर इतका शक्तिशाली होता की जेंव्हा जेंव्हा टिळक काँग्रेसमध्ये होते तेंव्हा तेंव्हा ते काँग्रेसचे सर्वात महत्वाचे नेते होते. काँग्रेसचा १८८५-१९०५ हा मवाळ कालखंड अनेक अनेक सन्माननीय परंतु बुद्धिवादी नेत्यांचा मिळून बनलेला आहे. तर पुढचा जहाल कालखंड हा निव्वळ लोकमान्य टिळकांच्या नावाने आहे. (जरी याला लाल बाल पाल म्हटलं जात असलं तरी). १९०५ ची स्वदेशी चळवळ लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेने पेटली. अरविंद घोष हा तरुण तरतरीत नेता त्यांनी देशाला दिला. मात्र त्यावेळी त्या चळवळीची अवस्था म्हणजे घोड्यावर बसलेले टिळक आणि लगाम सुटलेला अश्व अशीच झाली होती). टिळकांना ना विचारता, तरीही त्यांच्या प्रेरणेने अनेक गोष्टी घडल्या. त्याचा ठपका ठेवून त्यांना मंडालेला तुरुंगात जाणं भाग पडलं. वेद, खगोल शास्त्र याचा अभ्यास असलेले आणि गणित हा जीव की प्राण असलेले टिळक तिकडून तीन तीन ग्रंथ लिहून बाहेर पडले. ओरायन, वेदांचे प्राचीन वसतिस्थान आणि गीतारहस्य. आपल्याला बहुतेकदा शाळेत शिकवली गेलेली आर्य बाहेरून (म्हणजे कॉकेशस पर्वताकडून ) आले ही थियरी लोकमान्य टिळकांची आहे इतकं लक्षात आलं तरी या व्यक्तीचं माहात्म्य लक्षात येईल. (पुढे या सिद्धांताचा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तितकाच अप्रतिम प्रतिवाद करून आर्य इकडचेच असा प्रतिवाद मांडला. पण आज त्यांचे अनुयायी म्हणवून सवर्णांना युरेशियन म्हणून हिणवत असतात. लोकसभेत मल्लिकार्जुन खर्गे भाजपाला तुम्ही बाहेरचे असं हिणवून गेले. हा बाबासाहेबांचा पराभव मानायचा का?)
काँग्रेसमध्ये टिळकांना अनेक प्रतिस्पर्धी होते. पण मंडालेच्या तुरूंगवासानंतर काँग्रेसमध्ये त्यांची झालेली एंट्री ही गोपाळ कृष्ण गोखले आणि फिरोझ शहा मेहता यांच्या निधनानंतरची आहे इतका संदर्भ जरी लक्षात आला तरी पुरेसं आहे. जहाल मवाळ काँग्रेसचा मिलाप, काँग्रेस आणि मुस्लिम लीगचा मिलाप ही मुत्सद्दी नेता म्हणून टिळकांची सर्वात मोठी कामगिरी. मुत्सद्दी आणि रोखठोख हे गुण एका व्यक्तीच्या अंगी फार कमी वेळा असतात. प्रत्येक गुणाचा आपला फायदा तोटा असतो. पण वेळीच स्वतःला बदलायचं तरीही आपला प्रभाव कायम ठेवायचा हे कसब फार कमी लोकांकडे असतं. टिळकांना ते साधलं. त्यात त्यांच्या तुरुंगातल्या चिंतन, मनन आणि लेखनाचा फार ,मोठा हात होता.
पुढे टिळकांनी दुसऱ्या महायुद्धानंतर ब्रिटिश भारतीयांना हिंग लावून विचारत नाहीयेत म्हटल्यावर होमरूल चळवळ सुरू केली त्याचीच परिणीती पुढे दुसरा, १९१९ चा 'भारत सरकार कायदा' आणण्यात झाली. अर्थात या कायद्याने भारतीयांच्या तोंडाला पानंच पुसली. पण टिळक व्यस्त होते आपल्या व्हॅलेंटाईन चिरोल साहेबाविरुद्धच्या खटल्यात. या चिरोल साहेबाने एक लेख लिहून त्यांना 'भारतीय असंतोषाचे जनक' जे म्हटलं होतं. कसं चालेल.
पण या सगळ्या कालखंडात गांधीजी कुठे होते? पुढच्या लेखात याचं उत्तर.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment