Monday, April 27, 2015
इष्टापत्ती
शेजाऱ्यांशी कसं वागायचं हे कौटिल्याने केंव्हाच सांगून ठेवलंय परंतू जातपात पाळणारी असल्याने वैदिक संस्कृती इतकी बदनाम झालीये की हिंदू धर्मातल्या अनेकांना यात अनेक चांगल्या गोष्टी आहेत ही बाबच पचनी पडणे अवघड झाले आहे. आणि आपल्या बरीने ब्रह्मांडाचा आढावा घेणारी वैदिक संस्कृती पुरती अब्राहमण्यम झाली आहे.
कौटिल्य अर्थशास्त्रात राजाने आपले राज्य कसे टिकवून ठेवावे याचा हा परिपाठ आहे. कोणाही सामान्य माणसाला मुळापासून हादरवून टाकणारे सिद्धांत यात आहेत. हे भावना वगैरे किंवा मुल्य, नैतिकता किंवा तत्वे वगैरे असं काहीच नसतं. प्रेम, त्याग, बंधुभाव निस्वार्थी आणि निर्लेप कार्य या राजासाठी भंपक गोष्टी आहेत असे कौटिल्य मानतो. राजा हा राजा आहे आणि त्याने राजासारखंच वागायला हवं असं यात सांगून ठेवलं आहे.
प्राचीन भारतातल्या १६ महाजनपदांच्या काळात आपलं राज्य कसं कसं शाबुत ठेवावं याचे डावपेच चाणक्याने सांगितले आहेत. ते कुटील आहेत म्हणून याला कौटिल्य अर्थशास्त्र म्हटलं जातं. कौटिल्य अर्थशास्त्रात मंडळ नावाचा सिद्धांत आहे. राज्यांच्या सीमारेषा जेंव्हा एकमेकांना भिडलेल्या असतात तेंव्हा त्यांच्यात संघर्ष अटल असतो. अनेकदा हा संघर्ष जमिनीचा सुंदर सुपीक तुकडा किंवा पाण्याच्या प्रवाहावरून असतो. अश्या या शेजाऱ्यास अरी म्हणजेच शत्रू म्हणतात. भारत चीन, भारत पाकिस्तान तसेच भारत बांगलादेश हे संबंध कायम वादग्रस्त का याचे उत्तर आपल्याला येथे मिळते. पण शत्रू असणे ही कोणा एकाचीच मक्तेदारी नाही. शत्रूचेही त्याच्या शेजाऱ्याशी वाद असू शकतात. उदा: पाकिस्तान इराण, पाक अफगानिस्तान, चीन जपान, चीन व्हिएतनाम आणि अगदी चीन मंगोलिया सुद्धा. म्हणून शेजाऱ्याचा शेजारी म्हणजे अरी अरी म्हणजेच शत्रूचा शत्रू म्हणजेच आपला मित्र बनायला हरकत नसते. आता आपल्याला कळलं असेल की चीन पाकिस्तान संबंध इतके मधूर का असतात आणि त्या इराणबरोबर आपण उत्तम संबंध का ठेवायचे. मोदींच्या जपान भेटीमागे, राष्टपती प्रणव मुखर्जी यांच्या व्हिएतनाम भेटीमागे हेच धोरण असतं.
पण सरसकट कोणत्याही देशाच्या परराष्ट्र धोरणाला हे लागू होत नाही. अनेकदा अगडबंब शेजारी असेल आणि तो शत्रू असेल तर त्याच्या आणि आपल्या मध्ये एक मध्यम राष्ट्र असायला हवे. परराष्ट्र धोरणात याला बफर स्टेट म्हणतात. यामुळे शत्रू जर उद्या चाल करून आला तर ,मधल्या बफर राष्ट्रामुळे हे आक्रमण लांब राहतं. म्हणूनच चीन आणि भारताच्या मध्ये नेपाळ, भूतान आणि पूर्वीचा सिक्कीम ही छोटी छोटी राज्ये ठेवावी लागतात. पण या राज्यांनाही वाऱ्यावर सोडून चालत नाही. सतत त्यांना गोंजारत बसावे. त्या देशात वातावरण कायमच आपल्याला अनुकूल ठेवावे. त्या देशाला सतत तो स्वतंत्र असल्याचे भासवत प्रत्यक्षात मात्र त्याला आपल्या कच्छपी लावून ठेवायचे असते. हे सगळं का तर आपल्या देशाच्या सुरक्षेसाठी. हे सगळं का तर आपल्या देशाच्या सुरक्षेसाठी. भारतची लोकसंख्या जगाच्या १७ टक्के असल्याने मानवतेच्या दृष्टीकोनातून वगैरेही भारताला हा धडा आत्मसात करायला हरकत नाही.
या आघाडीवर कामगिरी काय आहे? आपले सगळे शेजारी आपल्याबद्दल राग बाळगून असतील तर तो दोष आपला आहे . वाईट फार फार तर एक किंवा दोन असू शकतात. सगळे वाईट आणि मी एकटा मर्यादा पुरुषोत्तम असूच शकत नाही. नेपाळमध्ये कम्युनिस्ट सरकार येतं भर सोडून चीनबरोबर संसार थाटायला जातं. पशुपतीनाथ मंदिरात भारतीय पुजाऱ्यांनी पूजन करायची परंपरा असताना त्या पुजाऱ्याना मारहाण करून तिकडून हाकलून दिलं जातं. शेवटी तिकडच्या जनतेने त्या पुजाऱ्याना परत स्थानापन्न केलं. नेपाळ आणि भूतानमध्ये मिळून एक लाख मेगा watt वीज निर्मितीची क्षमता आहे. या देशाचा आपल्याला हाही उपयोग आहे.
ओता रे ओता नेपाळमध्ये मदत ओता, पैसा, अन्नधान्य, कपडे, माणसं सगळं ओता. आपत्ती आलीये त्यांच्यावर, जबाबदारी आहे आपल्यावर. नेपाळ, भूतान, बांगलादेश, श्रीलंका, म्यानमार, मालदीव, अफगानिस्तान ही आपली लहान भावंडं आहेत. त्यांच्याकडून काहीही परतावा न मागता त्यांना हवं ते द्या.
जुना साचलेला वाईटपणा आणि अढी निवळायची उत्तम संधी या आपत्तीमुळे आलीये. जुना धागा पुन्हा मजबूत करा. नेपाळच्या मूर्ख कम्युनिस्टांना हे आवडणार नाही आणि इकडचे बरेच समाजवादी 'नेपाळला मदत करता मग आमच्या शेतकऱ्यांना का नाही?' असा प्रश्न करतील. लक्ष देण्यासारखी ही मंडळी नाहीत. यांना उत्तर देणं म्हणजे आपलंच हसं करून घेणं.
आत्तापर्यंतच्या जबरदस्त कामगिरीबद्दल भारत सरकारचं हार्दिक अभिनंदन. मुख्य म्हणजे भारताच्या प्रसारमाध्यमांना मोठा सलाम. मतभेद विसरून देशहितासाठी एकत्र आल्याबद्दल.
Thursday, March 26, 2015
आयपीलवाल्यांचा वर्ल्डकप
भारतीय जनमानसात आजही क्रिकेट हा धर्म आहे. धर्माला मार्क्स अफूची गोळी म्हणाला होता. क्रिकेटच्या नावाखाली लोकांना आयपीएलपण चालून जातं. आपल्याकडे क्रिकेट हा खेळ केवळ लोकप्रिय आहे, त्याचा सखोल अभ्यास करणारे फारच थोडे. रोहित शर्माने एकदिवसीय सामन्यात दोन द्विशतकं हाणली की उन्मादित होणाऱ्या लोकांची संख्या आपल्याकडे जास्त आहे. पण या उन्मादात येत्या दोन महिन्यात ऑस्ट्रेलियात याच रोहितच्या bat ला बॉल तरी लागणार का हा प्रश्न कोणीच उपस्थित केला नाही. याच के सरा सरा (जो भी हो, सो हो) वृत्तीमुळे पुढे ऑस्ट्रेलियाच्या सामान्य संघासमोर आमचा संघ अतिसामान्यपणे खेळून हरला. याच पार्श्वभूमीवर विश्वचषक सुरु होत आहे.
आमच्या संघात गेल्यावेळचे खेळाडू नाहीत. ३ खेळाडूंनी आपल्याला हा अध्याय लिहून दिला होता. एक सचिन तेंडूलकर. प्रत्येक सामन्यात तो उभा राहिला. पाकिस्तानविरुद्ध तो शब्दश: उभा राहिला. त्याच्या खेळीत 'मेड इन सचिन' शिक्का नव्हता, त्याच्या हालचाली मंदावल्या होत्या विराटसोबत तीन धावा काढल्या की त्याला धाप लागत होतीं. नजर बसत नव्हती. पण तरीही ३८ वर्षांचा सचिन तेंडूलकर हा शेवटी सचिन तेंडूलकर होता. सगळ्या मर्यादा सांभाळत त्याने ४८२ धावा करत आपला जगन्नाथाचा रथ ओढला. आजच्या संघात त्याची जागा भरून काढणारा विराट कोहली आहे.
दुसरा युवराजसिंग. वैयक्तिक आयुष्याने त्याचं मन पोखरलं होतं आणि कर्करोगाने शरीर. युवराजला घ्यायचं की नाही हा मोठा प्रश्न होता. सचिन तेंडूलकरने विश्वचषक जिंकायचा असेल तर युवराजसिंगला पर्याय नाही असा शेरा दिला आणि युवराजसिंग संघात आला. ३६२ धावा आणि १५ बळी मिळवत त्याने आपण कशासाठी जन्मलो होतो हे दाखवून दिलं. सध्याच्या संघात त्याची जागा घेणारा खेळाडू रवींद्र जडेजा होऊ शकतो. पण शकतोच.
तिसरा, झहीर खान या संघाचा श्रीकृष्ण होता. अब्रू जायची वेळ आली की सखा म्हणून धावून यायचा. झहीर या संघाची कामधेनु गाय होता. कधीही विकेट्सची गरज पडली की तो तहान भागवायचा. नवीन बॉल, मधल्या षटकांमधला बॉल किंवा, जुना शेवटच्या षटकांमधला बॉल असो, त्याने कधीच निराश केलं नाही. झहीर हा गोलंदाजांमधला सचिन तेंडूलकर होता. कपिलदेव नंतर भारताचा सर्वोत्तम वेगवान गोलंदाज म्हणजे झहीर खान. म्हणूनच त्याची जागा कपिलसारखीच रिकामी राहणार. कारण असे खेळाडू जन्मालाच यावे लागतात.
आत्ताच्या संघाचा मुलभूत प्रोब्लेम हा आहे की धोनी, रोहित आणि रैना वगळता सगळेच खेळाडू आयपीएलग्रस्त आहेत. वर्षभर खेळून जितका पैसा, त्याहून जास्त एकट्या आयपीएल मध्ये. युवा खेळाडूंची अवस्था खेळाशी 'रिश्ता वही सोच नयी' अशी झाल्यास नवल नाही. अनेक खेळाडूंना आयपीएलबद्दल कृतज्ञता वाटत्ये , कारण त्यामुळे त्यांच्या घरात गजांतलक्ष्मी नांदत्ये. त्यांना आयपीएल वर्ल्डकपएवढीच किंबहुना अधिक मोलाची वाटत असेल तर तो दोष त्यांचा नाही. हा काळाचा महिमा आहे. आपण रवींद्र जडेजाला तू देशासाठी नऊ कोटींवर पाणी सोड असं म्हणू शकत नाही. जास्तीत जास्त नऊ कोटींसाठी देशावर पाणी सोडू नकोस असं म्हणू शकतो. गाठीशी फार शिक्षण नाही, आहे ते करियर तिशीपर्यंत, त्यातपण एखादी दुखापत किंवा गंभीर आजारपण त्या करियरवरसुद्धा पाणी फिरवू शकतं, वर अनेकजण दारिद्र्यातून वर आले आहेत, रिस्क असताना संधी मिळत असेल तर तीचा फायदा घेण्याचा त्यांचा हक्क आहे. आणि मुख्य म्हणजे खेळाकडे युवा पिढी यायला हवी असेल तर त्यांचे खिसे भरायला हवेत, परिवाराची रोजीरोटी चालायला हवी.
याचा दुष्परिणाम म्हणजे आता ५० षटकं खेळून काढायची खेळाडूंची मानसिकता नाही. तिसऱ्या आयपीएल दरम्यान हरभजनसिंगने एक सुरेख निरीक्षण नोंदवलं होतं, "सातत्याने आयपीएल गाजवणारे सगळेच उत्तम कसोटीपटू आहेत." दिवसभर मैदानात उमेदीने उभे राहणे, डाव उभारणे, एकाग्रतेने न थकता फलंदाजी, गोलंदाजी किंवा क्षेत्ररक्षण यालाच टेंपपरामेंट म्हणतात. आजच्या हिरोंना दोन बॉल्सवर रन नाही आली की क्रीझमधून पुढे येउन गोलंदाजाला त्याची जागा दाखवून द्यावीशी वाटते. गोलंदाजांची मानसिकता चारच षटकांची झाली आहे त्यातही फलंदाजाला रोखा, बाद करू नका. वर्ल्डकप विजयानंतर भारत परदेशात एकाच कसोटी सामना जिंकला. ज्याची कसोटी क्रिकेटवर हुकुमत असते तो संघ विश्वचषकात सातत्याने शिखरावर असतो. समझदारको इशारा काफी है।
तरीही धोनीच्या या आयपीएल संघाला वर्ल्डकपसाठी शुभेच्छा. नाही नीट खेळले तर पाकिस्तानला हरवल्याचा आनंद असेलच. दिल बेहलाने के लिये, तरीका अच्छा है.
Tuesday, March 17, 2015
इंच इंच लढवू
समृद्धी आणि विकास सर्वांनाच हवा असतो परंतु त्यासाठी आपली जमीन द्यायची झाली तर मात्र "इंच इंच लढवू" हा प्रत्येकाचा बाणा असतो. भारतासारख्या लोकसंख्येची घनता असलेल्या देशात जर प्रत्येकाने आम्ही आमची जमीन देणार नाही असे म्हणायला सुरवात केली तर प्रकल्प उभे राहणार नाहीत हे वास्तव आहे. अश्या परिस्थितीत नव्या जमीन अधिग्रहण कायद्याप्रमाणे खाजगी उद्योगपतींना जमीन अधिग्रहित करायची असल्यास ८० टक्के आणि सरकार खाजगी भागीदारीतून प्रकल्प येत असल्यास ७० टक्के लोकांची संमती ह्या तरतुदी म्हणजे तुमची जमीन कोणीच घेणार नाही. तेंव्हा हा कायदा उद्योगपतींच्या जीवावर उठला. तत्कालीन विरोधकांनीसुद्धा याला पाठींबा दिला.
तरीही हा कायदा आणण्यामागे जी परिस्थिती निर्माण झाली तिचा विचार करायलाच हवा. ऑस्ट्रेलियामध्ये अबॉरीजनल (आदिवासी) जमीन हक्क कायदा आहे. यानुसार जमिनीचा मूळ मालक जमिनीवर कायमच हक्क ठेऊन असतो. पण त्याच्या जमिनीत एखादा प्रकल्प उभ करायचा असल्यास त्याला त्या प्रक्रियेत भागीदार करून घ्यावेच लागते. तिथल्या सरकारने आदिवासींच्या
जमिनीत सोने सापडले तेंव्हा ह्याच कायद्याचा वापर केला होता. अभिजात युरोपीय भांडवलशाहीचा हा पैलू युरोप अमेरिकेचे गोडवे गाणारे किती भारतीय उद्योगपती लक्षात घेतात? आपल्याकडे भांडवलशाही कुडमुडी आहे. सरकारचे आधी बोट पकडून मग बखोट पकडून जमीन मिळवायची सरकारही मुन्नाभाईच्या थाटात ते करणार. जमिनीच्या मूळ मालकाला नोकरी देण्याचे आश्वासन
दिले जाते आणि मग शेतकऱ्याकडे कुठून आली आहे प्रगत तांत्रिक गुणवत्ता? म्हणून त्याला वॉचमन नेमले जाते. सरंजामी मानसिकतेतून आमचे उद्योगपती बाहेर पडत नाहीत, शेतकऱ्यांचा आणि मूळ मालकांचा आक्रोश त्याच्यापर्यंत पोहोचत नाही. कर्णबधीर नोकरशाही आणि असंवेदनशील व्यवस्था याच्या दुष्टचक्रातून पुढे २०१३ सालचा उद्योगांचे थडगे बांधणारा कायदा येतो. तरीही ह्या कायद्यात, ग्रामीण भागात बाजार भावच्या चौपट नुकसान भरपाई तर शहरी भावात हीच भरपाई दुप्पट तसेच सामाजिक परिणाम मुल्यांकन ह्या काही चांगल्या बाबी होत्या. पण खोलात जाऊन बघितले तर कमतरता आहेच. ग्रामीण भाग ठरवताना पुण्यातला कोथरूड गावठाण किंवा डोंबिवली एम आय डी सी हा भाग ग्रामीण आहे. तेंव्हा नुकसान भरपाई कशा प्रकारे मिळेल? त्याचप्रमाणे जमिनीचे शेती आणि बिगर शेती असे प्रकार पडतात, ज्याप्रमाणे किंमत दिली जाते.मोदी सरकारने आणलेला कायदा तर अगोदरच्या कायद्याचा पूर्णपणे गर्भपात करणारा कायदा आहे. सरकारी खाजगी भागीदारीतून उभे राहणारऱ्या उद्योगांना ७० टक्क्यांची अट नाही. यात सरकारी भागीदारी किती टक्के ह्याचा उल्लेख नाही. संरक्षण, ग्रामीण पायाभूत सुविधा, औद्योगिक महामार्ग आणि गरिबांना परवडणारी घरे यासारख्या क्षेत्रांमध्ये सामाजिक परिणाम मुल्यांकन होणार नाही. पूर्वीचा कायदा १३ गोष्टींना या मुल्यांकनातून सूट देत होता. आताचा कायदा त्यात ह्या गोष्टी अंतर्भूत करतो. शेतीच्याजमिनीची किंमत व्यावसायिक कारणासाठी वापरल्या जाणाऱ्या जमिनीपेक्षा अनेक पटीने कमी असते. शेतीचीजमीन शेतजमिनीच्या भावात मिळवून, तिची जमीनबँक तयार करून पुढे काही शे पटींनी विकण्याचा धंदा जोरातचालू आहेच. पाच वर्षात उद्योग उभा राहण्याची अट काढल्यामुळे हे सहज शक्य आहे.
ह्या तरतुदी विरोधकांना कोलीत देत आहेत. भागीदारीमध्ये तोंडदेखल्या म्हणून सरकारचा सहभाग दाखवून संपूर्णपणे खाजगी उद्योगपतींना मोकळे रान देऊ शकणारा हा कायदा आहे. ह्याला भरीस भर म्हणून टोकाचा विरोधही होत आहे. माध्यमांमध्ये ठाण मांडून बसलेल्या समाजवादी मंडळींकडून 'उद्योगपतीला भिक मागत शेतकऱ्याच्या दारात येउ द्या की' अशी भाषा वापरली जात आहे, शेतीच देशाच्या अर्थव्यवस्थेला कशी पुढे घेऊन जाऊ शकते आणि इतर क्षेत्रांचे महत्व कसे काहीच नाही अशीही मते आता पुढे येऊ लागली आहेत. पायाभूत सुविधा आणि विकास हे भितीदायक शब्द होत आहेत. कायदा आणण्यापूर्वी शेतकऱ्यांशी किंवा किमान राजू शेट्टी सारख्या लोकांशीसुद्धा चर्चा न करणाऱ्या मोदी सरकारला या मुद्द्यांवर दोन पावले मागे जावेच लागेल, विरोधकांशी जमवून घ्यावेच लागेल. विरोधकांनाही बेगडी भूमिका सोडून विधायक भूमिका घ्यावी लागेल. किमानपक्षी "अधिग्रहण" हा आग्रह सोडून विक्री किंवा भाडेतत्वावर आधारित व्यवहार आणावे लागतील. ५६.६% लोकसंख्या जर शेतीच्या माध्यमातून सकल भारतीय उत्पन्नात१३.७% वाटा उचलत असेल तर ही परिस्थिती कुठेतरी बदलायला हवी.
मनमोहसिंग सरकारने राष्ट्रीय सल्लागार परिषदेतल्या समाजवादी मंडळींच्या नादी लागून आधीचा कायदा आणला तर कोणालाही न पुसता मोदी सरकारने हा कायदा आणला. एका बाजूला दोन्ही टोकाच्या भूमिकांवर आततायी वागणारे आणि दुसऱ्या बाजूला सदैव मतांचे राजकारण करणारे देशाला कुठे घेऊन जातील कोणास ठाऊक? ह्या सगळ्याच्या पलीकडे संसदेला वेठीस धरणारे, आम्ही इजिप्त सारखी क्रांती करू आणिसरकारचा राजीनामा घेऊ म्हणणारे सामाजिक कार्यकर्ते संसदेला घेराव घालण्याच्या बेतात आहेत. संसदेवरआमचा विश्वास नाही कारण तिने आपलं चारित्र्य गुंडाळलय असं हे म्हणणार आणि त्याच संसदेने हाजुलमी कायदा अमान्य केला तर काय या प्रश्नावर तोंड फिरवणार.
तूर्तास सरकारला माघार घ्यावी लागणार हे नक्की. आपल्याला किमान लोकशाही जिवंत असल्याचं समाधान.
Monday, February 16, 2015
अर्थव्यवस्था विरुद्ध गुणवत्ता
२००४ साली भारतीय संघ पाकिस्तान दौऱ्यावर गेला असताना शहीद आफ्रिदीने भारतीय कर्णधार सौरभ गांगुलीला आपल्या घरी बोलावलं. गांगुली सपत्निक आफ्रिदीच्या घरी गेल्यावर त्याला सरप्राईझ मेन्यू लक्षात आला. पण सगळ्यात मोठा धक्का आफ्रिदीसाठी होता, कारण ब्राह्मण असल्याने सौरभ गांगुली पूर्णपणे शाकाहारी होता. आफ्रिदीने सगळा बेत बाजूला सारून गांगुलीसाठी जवळच्या चांगल्या हॉटेलमधून डाळ मागवली. भारत पाकिस्तान सामन्यांवरून सध्या आफ्रिदीच्या मातेवरून शिव्यांचा जो उत आलाय तो मराठी समाजासाठी लज्जास्पद आणि बालिश पातळीचा आहे. आशिया कप मध्ये आफ्रिदीने धुवाधार खेळत पाकिस्तानला सामना जिंकून दिल्याचा राग अजूनही आमच्या मनात आहे. पण तो सामना आपण विकेटकीपर दिनेश कार्तिकच्या झोपा काढण्यामुळे गमावला होता हे कोणीच आठवत नाही.
क्रिकेटपटूने २४ तास क्रिकेट खेळावं किंबहुना त्या पातळीवर राहावं हीच आमची अपेक्षा असते. त्या सगळ्यापलिकडे तो एक माणूस असून त्याला काही एक वैयक्तिक आयुष्य आहे हेच आपण समाज म्हणून विसरतो. ऐंशीच्या दशकात भारताच्या हॉकी कर्णधाराने पाकिस्तानी कर्णधाराबरोबर आपली दारूच्या पेल्यातली मैत्री आहे हे उघड केल्यावर भारतात तीव्र प्रतिक्रिया उमटली होती. १९९६ साली वासिम अक्रम आणि महम्मद अझरूद्दीन बिर्याणी खाताना दाखवले होते. त्यानंतर अझर पाकिस्तानविरुद्धच वाईट का खेळतो असा मूर्ख प्रश्न विचारला गेला होता. 'चक दे इंडिया' चित्रपटात हताश भारतीय कर्णधार कबीर खानशी पाकिस्तानी कर्णधार येउन फक्त हात मिळवतो आणि नेमकी तीच पोझ जगजाहीर होऊन कबीर खानने जाणून बुजून स्वत: स्ट्रोक घेऊन तो चुकवला असं काहूर उठतं. कबीरखानचं करियर संपतं. मीर रंजन नेगी या मुस्लिम भारतीय कर्णधाराबरोबर हे घडलं होतं. समाज इतका असहिष्णू का होतो? १९९६ साली वासिम अक्रम भारताविरुद्ध उपांत्यपूर्व सामना खेळू शकला नाही तेंव्हा पाकिस्तान हरल्यावर त्याच्यावर गद्दारी केल्याचा आरोप झाला होता.
आपल्याला फाळणी आणि पुढे दहशतवादाचा शाप लागलाय म्हणून पाकिस्तानशी सामना म्हणजे युद्धच असा काहींचा युक्तीवाद असेल. जगभरात अनेक मुस्लिमांना पाकिस्तानचा पराभव हा इस्लामचा पराभव वाटतो. १९९० च्या दशकात भारतीय संघ पाकिस्तानशी सातत्याने हरायचा. त्यावेळचे पंच फितूर असायचे, एकदा तर अंधारात सामना खेळवला गेला होता. पण शुक्रवार म्हणजे भीतीचा वार ही खुणगाठच मनाशी बांधलेली. शारजा म्हणजे हारजा आणि शुक्रवार म्हणजे झुम्मा म्हणजे पाकिस्तानला थेट अल्लाचा आशीर्वाद हेच मनाशी धरून भारतीय संघ कोसळायचा. मग ह्या शुक्रवारी अझर नीट का खेळत नाही किंवा ह्याच शुक्रवारचा सचिन तेंडुलकरला फरक का पडत नाही हे प्रश्न आपण पाडून घेतलेच नाहीत.
पुढे काळ असा आला की भारताची अर्थव्यवस्था बदलली आणि आत्मविश्वासाने भरलेले खेळाडू येउन मिळाले. उत्तम, अनुभवी पण घाबरट खेळाडूंनी कच खाल्ली आणि सौरभ गांगुली, राहुल द्रविड, लक्ष्मण संघात आले. पुढे वीरेंद्र सेहवाग, झहीर खान, युवराज सारखे अरे ला कारे करणारे खेळाडू आले. कोणत्याच भारतीय कर्णधाराने सद्गुणविकृती दाखवत यांना झापले नाही. गांगुलीने पाकिस्तानला शुक्रवारी पाकिस्तानात डावाने हरवलं. आजच्या पिढीला शुक्रवार, शारजा ह्या गोष्टी सांगितल्या तर आपल्याशी ते बोलणार नाहीत. आज जी पिढी चाळीशीतली आहे त्यांना ह्या गोष्टी आठवून हसायला येत असेल. भारत महासत्ता होण्याचा क्षमतेचा होणे आणि भारतीय क्रीडा क्षेत्रात वाहू लागलेले नवे वारे यात निश्चितच संबंध आहे. रविवारी जे झालं तो नव्या ताज्या दमाच्या पोरांचा उरूस होता. २००४ ला 'हिस्ट्री मीन्स लिट्टील फॉर मी' ह्या गांगुलीच्या विधानाने आमची मानसिकता बनवून दिली. पाकिस्तानचे खेळाडू तेच विसरले होते. गेली काही वर्षे भारताविरुद्ध त्यांची देहबोलीच अपराध्याची होते.
पण समाजमन म्हणून आमची काही प्रगती झालीये का? पाकिस्तानला हरवल्यावर जो जल्लोष झाला तो कीव करण्याच्या पातळीचा होता असं म्हणता येईल. आम्ही फटाके फोडले आणि पाकिस्तान्यांनी टीव्ही. त्यांनी भारताशी स्वत:ची तुलना करावी हे समजू शकतं पण भारताचं काय? शिकारी कुत्र्याने उंदीर मारल्यावर जल्लोष झाला तर उंदराला उगीच मान दिल्यासारखं असतं. परवाचा सामना हा निव्वळ नैसर्गिक गुणवत्ता विरुद्ध आर्थिक महाव्यवस्था असा विषम होता. गेल्या २२ वर्षात या देशाने जी झेप घेतली तीच जर कायम राहिली तर हेच होत राहणार, सामने निश्चित नाहीत पण निकाल मात्र निश्चित आहेत. आनंद कोणत्या गोष्टीचा बाळगायचा हे ज्याचं त्याच्यासाठी. ह्या प्रकरणी समाज माध्यमे अधिक पुढाकार घेऊ शकतील, पण तीच सध्या मोदी पवारांना बारामतीत जाऊन भेटले ह्या गोष्टींवरून राजकीय आखाडे बांधतायत. सदा न कदा निवडणुकांतच राहणारा विचारवंत वर्ग आणि भारत पाकिस्तानला तोडीस तोड प्रतिस्पर्धी मानणारे आपण लोक. देशाची प्रगती होईल पण समाजाची निकोप प्रगती यातून होणार नाही.
Saturday, January 5, 2013
केवळ कायदाच खरोखर काही करू शकेल का?
केवळ कायदाच खरोखर काही करू शकेल का?
दिल्लीमध्ये राहणाऱ्या त्या तरुणीवर जिवावरचा प्रसंग गुदरला. शेवटचे काही दिवस तर जो प्रसारमाध्यमांनी गोंधळ घातला त्यातून तर ती बिचारी आता सुटली तर बरंच होईल असंही वाटून जात होतं. आता ही घटना घडून गेल्यावर भविष्याचा विचारही व्हायला हवा. सर्वात महत्वाचे म्हणजे या प्रकाराला आळा कसा घालायचा? आपण सर्वांनी एकच ठरवून ठेवलेले आहे, आणि ते म्हणजे कायदे कडक हवेत. सर्वात आगोदर त्या कायद्यांचा विचार करूया. वखवखलेला मिडिया,जेमतेम हातवारे करीत बोलणाऱ्या मुलीचं मनोगत "पाहत राहा फक्त आमच्याच वाहीनीवर", असं बोलणारे माध्यमकर्मी, निर्भया दामिनी असली बारशी करणारे हौशे नवशे आणि गवशे पत्रकार. महिना ६०० रुपयात आरामात घर चालते आणि बलात्कार ज्या बस मध्ये झाला ती सरकारी नव्हती असली विधाने करणारे दिल्ली मुख्यमन्त्र्यान्सकट सर्व राजकारणी आणि भर कोर्टात पोरी तू कपडे कोणते घातले होतेस? असला हिडीस प्रश्न विचारणारे कायद्याचे रक्षक यातून तर कोणत्याही मुलींना न्याय मिळणार नाही. आणि जरी तो मिळालाच तरी शिक्षा तर मिळेल पण पुढे काय? आपण सर्व कंठशोष करून म्हणतोय कायदे बदला आणि अधिक कडक करा. पण त्याने खरोखरीच काही बदलणार आहे का? बलात्काराच्या गुन्हेगाराला शिक्षा होते ७ वर्षांची. तिला ३० वर्षांची करून जर हे गुन्हे कमी होतील असा जर आपण मनात असू तर आपण नक्कीच मूर्ख आहोत. 'बलात्कारीला जर फाशी दिली गेली तर यात पुढे बदल घडेल' असं आपल्याला वाटत असेल तर आपण बावळट निष्पाप आहोत आणि सर्वात महत्वाचे म्हणजे 'कायदा माणसाच्या मनावर परिणाम करणारा हवा' असला काहीतरी समज मनात ठेऊन त्या मेणबत्तीबाजांबरोबर आपणही त्यांची री ओढणार असू तर समाज म्हणून आपण अजूनही लोलिपोप वयाचे आहोत हे गृहीत धरायला हरकत नाही. मुद्दा एकदम साधा सरळ आहे. जर ती अभागी मुलगी गेली नसती तर तिच्यावर अत्याचार करणाऱ्यांना फाशी झालीच नसती. खास लोकाग्रहास्तव अमुक एक शिक्षा देण्याची तरतूद आपल्याकडे नाही आणि ते योग्यच आहे. शिक्षेला काही एक कायद्याने प्रस्थापित केलेली प्रक्रिया असते. ती राबवताना पुरावे काळवेळ आणि मुख्य म्हणजे नीरक्षीरविवेक नावाचा प्रकार लागतो. आणि समजा खास लोकाग्रहास्तव बलात्काराच्या गुन्हेगाराला फाशीची शिक्षा होणारा कायदा जर अस्तित्वात आला आणि जर ती मुलगी जिवंत असती तर त्या गुन्हेगारांना शिक्षा जुन्या कायद्याप्रमाणेच होणार होती. कारण एखादा कायदा गुन्हा घडून गेल्यानंतर अस्तित्वात आला असेल तर त्या गुन्ह्याला तो लागू होत नाही. शिक्षा मिळणार असेल तर ती त्या गुन्ह्यादरम्यानच्या प्रचलित कायद्यानुसारच मिळते. आणि आपल्या देशात कायदा महत्वाचा, भावना नाही. आणि तेही योग्यच आहे. आता ती बिचारी गेली. त्यांना जन्मभराची शिक्षा मिळूदे आणि तीही लवकरात लवकर याबाबत दुमत होण्याचे कारण नाही.
आता जरा भविष्यावर बोलू काही.
बलात्काराच्या गुन्हेगारला समजा फाशीची शिक्षा अस्तित्वात आणली तर? खरोखरीच असले प्रकार कमी होतील? दारूच्या नशेत एखाद्या अबलेला भक्ष्य करणारा कायद्याचा विचार करेल का? कोणत्याही भावना अनावर झाल्यावर कोणी परिणामांचा विचार करतो का? आणि नंतर जर तो नराधम (पशु म्हणू नका, ते असं करीत नाहीत) भानावर आला तर तो त्या मुलीला प्रथम संपविणार नाही हे कश्यावरून? तो हाच विचार करणार कि एवीतेवी फाशी होतेच आहे तर तिला मारू का नये? त्यातून फाशी तर वाढणार नाहीच पण जमल्यास पुरावा नष्ट करून पोलिसांच्या तावडीतून सुटायचा प्रयत्न तरी करता येईल. कायदा हा प्रचंड तोकडा असतो. तो गुन्हेगाराचे मनपरिवर्तन करूच शकत नाही. कोणत्याही समाजात कायदा हा बेगॉन सारखा असतो. तात्कालिक डास मरतीलएक दिवस असा येईल की बेगॉन संपेल पण डास वाढलेले असतील. त्यांची उत्पत्ती थांबणार नाही. गुन्हेगार हे तसेच असतात. १५व्या मजल्यावर डास नसतील असा समज असेल तर लिफ्टमधून येउन डास तो खोटा ठरवितात. म्हणजेच प्रत्येक व्यवस्थेतून पळवाट काढण्याचे महामार्ग खुले असतात. मेंबात्तीबाजांना हे कळणार आहे का? कळल्यास झेपणार आहे का? दिवस रात्र गॉगल चढवून लंब्या चौड्या मुलाखती देणारे हे लोक घरातघरात अत्याचार होतात त्यांच्या नावाने ब्र काढीत नाहीत. ती दुर्दैवी मुलगी गेली. तिच्या मारेकऱ्यांना जबर शिक्षा होउदे. पण हे म्हणजे म्हातारी गेली जीवानिशी पण काळ मात्र सोकावतोय असंच झालं. आणि त्या मेणबत्ती संप्रदायाला सांगा त्या फालतू ads बंद करा. GOOD GIRLS GO IN HEAVEN, BAD GIRLS GO EVERY WHERE, SKORE CONDOMS. नारी जातीबद्दल फार सुंदर संस्कार करणारी ही जाहिरात बघून एखाद्यला बलात्काराची खुमखुमी येणार असेल तर हा मेणबत्ती संप्रदायआणि त्यांनी सुचवलेला कायदा काही करणार आहे का?? सासरे बुवांशी अश्लील चाळे करायला जाणारी सून क्रिकेट सामना चालू असताना बघत राहायचं का तर म्हणे AXE इफेक्ट . स्त्रियांना ज्या प्रकारे वखवखखलेल दाखवतात त्याबद्दल हे लोक दगडफेक करतील का?डासांना तयार करणारी दलदल ती हीच. इथे सेन्सॉरशिप घातली तर विचार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला म्हणून हेच मेणबत्तीबाज बोंब ठोकणार. सगळ्यात वीट आणणारा प्रकार म्हणजे अगदी ज्येष्ठ समाजसुधारक म्हणून मिरवणाऱ्या व्यक्ती पोलिसांनी सरकारने सक्षम राहावं म्हणून अपेक्षा धरतात. यात अवाजवी काही नसेल. पण मुंबईसारख्या शहरात जर ८०० ते ९०० लोकांमागे जेमतेम एक दांडुकाधारी असेल तर प्रत्येक मुलीमागे एक पोलिस ठेवायचा काय?
सरतेशेवटी हे प्रकार रोखायचे कसे हा प्रश्न राहतोच. साधा सरळ आणि प्रामाणिक सवाल आहे. एक हजार वर्षांपूर्वी बलात्कार होता? शंभर वर्षांपूर्वी होता? पाच वर्षांपूर्वी पण होताच ना? मग इतक्या मोठ्या काळात समस्त नारी जमातीने हे प्रकार रोखायला काय काय केलं? जगाबद्दल सोडून द्या. धर्म न मानणाऱ्या लोकांचा समुह लोकसंख्येत दुसऱ्या नंबर वर आहे. आपण तर महाभारत रामायण वाचतो ना? त्या गोष्टी खऱ्या खोट्या कशाही असतील. पण कायम द्रौपदीने कृष्ण किंवा भीम यावा अशी अपेक्षा का म्हणून ठेवायची? कायम सीतेने रावणाच्या भीतीत का राहायचा? यांना सोडूया. 'सिंघम', 'दबंग', 'रावडी राठोड' सारखे पुरुषप्रधान सिनेमे येणार, यातून कोणती शक्ती समाजाला मिळत्ये? यातून स्त्रियांबद्दल काय वाटत राहतं? "सौंदर्य हे स्त्रीचा सामर्थ्य असेल तर सामर्थ्य हे पुरुषाचा सौंदर्य असतं" हेच आपण किती काळ कुरुवाळत बसणार? म्हणून एक प्रश्न करावासा वाटतो. इतक्या मोठ्या काळात समस्त नारी जमातीने हे प्रकार रोखायला काय काय केलं? फेसबुक whatsapp हा रोजच्या जीवनाचा भाग असलेल्या नसलेल्या किती मुलींना आपल्यावर बलात्कार होऊच शकत नाही याची खात्री आहे? मग त्यांनी त्यांच्या परीने हे प्रकार रोखायला म्हणून काय केलं? सेकंदाला काही किलोमीटर वेगाने हात किंव्हा पायाचा आघात करून समोरच्याला रक्त ओकत मारायला लावण्याचं कसब किती जणींनी आत्मसात केलं? बलात्काराच्या गुन्ह्यांमध्ये (किंवा तक्रारींमध्ये म्हणा हवं तर) जशी वाढ झाली तशी कराटे ज्युडो क्लासेसना जाणाऱ्या मुलींच्या प्रमाणात वाढ का नाही झाली? किती मुलींनी आपली शारीरिक ताकद वाढवायला सुरुवात केली? या गोष्टी जगण्याचा भाग का नाही होऊ शकल्या? मग कशाला ती आदिमाया, तुळजा भवानी, कालीमाता किंवा दुर्गामाता पुजत बसायचं? तिने मदतीला यावं अशी हाक मारत बसायचं कि आपण तिच्यासारखं व्हायचं? कितीजणींनी हा प्रश्न पडून घेतला?.
या देशातल्या स्त्रियांनी सर्वप्रथम त्या कमजोर आहेत हे मान्य करावं. (म्हणूनच बसमध्ये वेगळी जागा) आणि हि कमजोरी दूर कशी होईल याकडे लक्ष द्यावं. आपण मान्यही करणार नाही आणि एखादा सनी देओल मिळत राहावा अशी अपेक्षा धरत बसणार. ज्यादिवशी ज्युडो कराटे या समाजातल्या स्त्रियांच्या जीवनाचा भाग होईल त्या दिवशी हे गुन्हे अनेक टक्क्यांनी खाली येतील. लोकांच्या सहभागाशिवाय काही शक्य नाही. आपण पोलिओ नेस्तनाबूत केला, एड्सला पराभूत करतोय. हे सगळ आपल्या सहभागामुळे झालं आहे, आज सक्षमिकरणाची हि अशी गरज आहे. मेणबत्या हातात घेऊन फक्त श्रद्धांजली देता येते. बस. शेवटी एकच विनंती म्हणजे त्या हवालदाराच्या मरणाबद्दल "बर झालं" अशी भावना जी यायला लागलीये ती फार वाईट आहे. उलट हे जे आपण रडण्याचं सेलिब्रेशन करतोय न त्यातला एक अश्रू त्या घरदार असलेल्या पोलीसासाठीपण राखून ठेवा. शेवटी तुम्हाला वाचवायला आजतरी त्याचेच भाऊबंद येणार आहेत.
भारतीय संघाच्या मागील वाईट कामगिरीची कारणे
भारतीय संघाच्या मागील वाईट कामगिरीची कारणे मला खालीलप्रमाणे वाटत होती.
१) द्रविड, लक्ष्मण, अनिल कुंबळे आणि सौरभ गांगुली यांचा आता अस्त झाला आहे. यांच्याकडे मिळून ५०० कसोटी सामन्यांचा अनुभव होता. हा संघ नवीन आहे.
२) सेहवाग १० पैकी पूर्वी ३ वेळा खेळायचा आता एकदाच नीट खेळतो. पण तरीहि "तो असाच खेळतो, हाच त्याचा नैसर्गिक खेळ आहे, ज्या दिवशी तो खेळतो तेंव्हा सगळ्यांची दाणादाण उडवतो ...." असली वाक्ये सुनील गावस्कर सेहवाग वर टीका करण्या ऐवजी BCCI कडून पैसे घेऊन करतो. १०१ वी कसोटी खेळणारा सेहवाग शाळेतल्या मुलांसारखा बाद होतो. गेल्या काही वर्षांत अनुभवामुळे त्याच्यात झालेला मोठा बदल म्हणजे तो आता कमी धावा करून वारंवार बाद होतो.
३) आज जी जिद्द चेतेश्वर पुजारा दाखवतो तीच जिद्द गौतम गंभीर पदार्पणात दाखवत असे आता ते दिवस राहिले नाहीत चेतेश्वर चा गंभीर होणार नाही कशावरून? सलामी बोंबलली.
४) सचिनच्या कारकीर्दीचा फक्त संधिप्रकाश उरला आहे. खाजगीत साचूनही हे मान्य करेल
५) धोनी, विराट कोहली हे कसोटीच्या लायकीचे नाहीत. कसलेल्या फलंदासासाठी कसोटी म्हणजे ग्रेट अभिनेत्यासाठी नाटक. त्यात सगळी म्हणजे सगळी तयारी होते. अगदी IPL गाजवणारे मोठे फलंदाज किंव्हा गोलंदाजही कसोटी खेळणारे आहेत हे पाहिलं कि कसोटी क्रिकेटची महती लक्षात येईल. हे दोघं त्याच्या आसपासही नाहीत. रैना तर मुळीच नाही.
५) हरभजन चा खांदा गेलाय. १७ व्या वर्षापासून त्याने असामान्य सेवा दिली आहे. वय त्याला चुकणार नाही.
६) अश्विन ओझा ला अजून खूप प्रगती करायची आहे.
७) भारतीय खेळपट्ट्या झहीर साठी कधीच चांगल्या नव्हत्या. जे कापिलसाठी आव्हानात्मक होतं ते झहीर कडून अपेक्षित करणं इज टू मच.
८) ग्रॅम स्वान सार्वकालिक उत्तम फिरकी गोलंदाजांपैकी एक आहे. आणि मोन्ति पानिसर तर भारतीयाच आहे. त्यामुळे इंग्लिश फिरकी गोलंदाजी आपल्यापेक्षा उत्तम असू शकते आणि मुख्य म्हणजे आपली गोलंदाजी त्यामुळेच तेही चांगले खेळू शकतात हेच आपण स्वीकारू शकत नाही.
९) त्यांचे चेंडू हातभर वळतात आणि त्याच खेळपट्टीवर आपले चेंडू वितभर सोडा इंचभरही वळू शकत नाहीत हे माहित असूनही आपल्याला आखाडा हवा.
१०) भारतीय संघ बाहेर जाऊन जिंकला आहे तर बाहेरचे संघही तेच करू शकतात. आता तंत्रज्ञान विकसित झालाय. प्रशिक्षण सुधारलंय, बॅडपेचं चा काळ कमी झालाय.
पण ही कारणीमिमांसा मी इथेच थांबवली कारण मला BCCI आणि मिडियाच्या दिव्य ज्ञानापुढे नतमस्तक व्हावासं वाटलं. त्यांच्यामते खालील कारणं आहेत.
१) सचिन संपलाय
२) त्याच्या धावा होत नाहीयेत.
३) त्याचे पाय आता हलत नाहीत.
४) त्याचा फॉर्म गेलाय.
५) नाऊ हि इज ४०
६) तो निवृत्त होत नाहीये
७) त्याच्यामुळे नवीन खेळाडू अडलेत
८) त्याची नजर कमी झालीये.
९) त्याची शरीराची स्टाईल bat पकडण्याची बद्धत चुकीची आहे. (जसंकी म्हणूनच त्याने ३४००० धावा केल्या)
इतिहासाकडून काही धडा घेतला नाही की असा होतं. मग तुम्ही इतिहास रचू शकत नाही. तुम्हाला कायम फक्त वर्तमानाला सामोरं जावं लागतं.
शहिन प्रकरणतला धडा
शाहिन धाडा या मुलीच्या फ़ेसबुक स्टेटस वरुन सध्या वाद्ळ उठलय. "बाळासहेबाञ्च्या निधनाबद्द्ल बन्द काय ठेवता गडे???" असा या मड्डम चा सवाल आहे। याहिपेक्षा भयानक आहे ती तिची भाषा. " एका राजकारण्याच्या मृत्यूबद्दल, तेही नैसर्गिक, संपुर्ण शहर बंद का??" असा तिचा सवाल आहे. तिचा पुढचा प्रश्न असा की आपण भगतसिंग राजगुरू बद्दल कधी 2 मिनिटे तरी शांत बसतो का? माणसे काय रोजच्या रोजच मरत असतात त्यांच्या बद्दल आपणकधी मौन बाळगतो का??बाळासाहेबानबद्दल कोणी काय बोलावे हा ज्याचा त्याचा प्रश्न असेलही.. बंद ला पाठिंबा द्यावा की नाही हे मत व्यक्तकरायचा अधिकार प्रत्येकाला आहे. पण चीड आणणारी. आहे ती तिची भाषा. "एका राजकारण्याच्या???" म्हणजे राजकारण्याचा मृत्यू आणि सामान्य माणसाचा मृत्यू सारखाच का? तिच पुढच लिहीण अस की मान हा मागून मिळत नाही तो मिळवावा लागतो. म्हणजे ही बया ठरवणार की बाळासाहेब मोठे होते की नाही. 7 किलोमीटरच क्षेत्रफळ व्यापून राहिलेली गर्दी हिला दिसली नाही? 20 लाखापेक्षा जास्ता संख्येने आलेली माणसे हिला बघता आली नाहीत का? आणि हो हे अस काहीतरी ही तामिळनाडूत किवा बंगालमध्ये बरळु शकेल का? प्रश्ना मराठी अमराठीचा नाहीच. तथाकथित अभिजन वर्गात आज राजकारण्याबद्दल जी घृणा साचून राहिली आहे त्यातून हा उद्दामपणा येत असतो. अमिताभ, सचिन, लता, आणि अशी अनेक नामांकित मंडळी त्यांना भेटून गेली ती काय धमक्या आल्या म्हणून?? पंतप्रधानांनी आपला डिनर कार्यक्रम पुढे ढकलला शोक व्यक्त केला , राष्ट्रपतींनी आपला दौरा रद्द केला ते काय शिवसेनेने सांगितले म्हणून? या मॅदम ची पुढची तर कमालच आहे. we are resilient by force and not by choice. अस काही बाही ती लिहून गेली आहे. म्हणजे काय? resilient या शब्दाचा अर्थ आहे 'पूर्ववत होणे'. मग हिला नक्की काय म्हणायचे आहे? हा संवाद A WEDNESDAY चित्रपटात नसिरुद्दीन शाह च्या तोंडी दहशतवादी हल्ल्यातून सवरण्या बद्दल चा आहे. काय म्हणायचा काय या शाहीन ला? हिला इंग्रजी येत नाही का? मग लिहिते बोलते कशाला? अडाणी असण हा गुन्हा नाही. पण त्याची मीजास होता नये. आणि ज्या प्रकारे इंग्रजी आणि इतर वर्तमानपत्रे या अडाणी पणाला मिजशिच स्वरुप देत आहेत ते पाहता ही वृत्ती वेळीच आवरली जायला हवी.
Subscribe to:
Posts (Atom)