शासकीय मराठीची जन्मकथा
           भाषा ही अभिव्यक्तीचे मध्यम असेल तर समर्पक शब्दरचनेशिवाय तिचे हे कार्य पूर्ण होऊच शकणार नाही. ही अभिव्यक्ती आविष्कृत होते ती व्यवसायाप्रमाणे, सामाजिक दर्जाप्रमाणे आणि नातेसम्बंधान्प्रमाणे. उदा: एखाद्या न्यायाधीशाने आपल्या कामकाजात वापरलेली भाषा ही दोन मित्रांच्या एकमेकांमधील भाषेपेक्षा नक्की वेगळी असते. तिचा पोत वेगळा  असतो, प्रदेशाप्रमाणे तिचा लहेजा वेगळा असतो आणि कामकाजाप्रमाणे तिचा आबही पूर्णपणे वेगळा.
          आपल्याला भाषेचे अनेक पदर बघता येतात त्यातली गोडी अनुभवता येते. केवळ मराठी भाषेच्या बोलींचा अभ्यास करायचं झाल्यास आपल्याला अहिराणी, वऱ्हाडी, डांगी मालवणी, हळ्बी अश्या १ नाही २ नाही तर तब्बल ३९ भाषा अभ्यासता येतात तरीही महाराष्ट्राची मराठी भाषा म्हणून जिचा प्रचार आणि प्रसार केला जातो ती म्हणजे पुण्या मुंबईची म्हणून ओळखली जाणारी मराठी भाषा. ही एक प्रकारची बोलीच. काळाच्या ओघात वेगवेगळ्या कारणांमुळे तिला प्रमाण भाषेचा दर्जा मिळाला आहे सरकारी पातळीवर हिच
.भाषा आता मराठी म्हणून ओळखली जाते. उद्या जर एखाद्या  अमराठी व्यक्तीला मराठी शिकावी लागली तर या भाषेचा वापर होतो. 
          हे झाले भाषेबद्दलचे विवेचन. पण भाषा म्हणजे काही केवळ अक्षरांशी केलेला खेळ नाही तिच्यात वाक्प्रचार असतात. असतात, म्हणी असतात, वेगवेगळे बलाघात समाघात (Accents) असतात. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मोठा शब्दसंग्रह असतो. या सर्वांनी  युक्त असूनही ती साचेबद्ध ना होता  असते नवनवी वळणे घेत असते. नवे प्रवाह पचवत असते. म्हणूनच ती वर्धिष्णू असते. मराठी भाषाही याला अपवाद नाही.
            हाच दृष्टीकोण मनात बाळगून आपल्याला सरकारी भाषेचा अभ्यास करता येईल. शासकीय मराठी थोडी गंभीर वाटते आणि थोडी जडही. पण  ती समजायला अडचण काहीच येत नाही फक्त ती  सरकारी भाषा असल्यामुळे तिची ठेवण इतरांपेक्षा अलग असते. 
 
 
शासकीय मराठीचा उगम (शिवकालीन मराठी)
शिवकालीन कालखंड म्हणजे १७ वे शतक. यापूर्वीची मराठी भाषा म्हणजे प्राकृत भाषेचा आविष्कार. या भाषेवर संस्कृत भाषेचा प्रभाव अधिक होता. उदा: चक्र हा शब्द्द. याचा शब्दाची काळाप्रमाणे रूपे बदलली. चक्र -> चक्क -> चाक असं त्याचं प्रवास झाला. संस्कृत ही सामान्य लोकांची भाषा कधीच नव्हती. आजही नाही. पण तरीही आपल्याला संस्कृत वाचताना कुठे तरी काहीतरी कळत असल्याची जाणीव होत असते कारण आपल्याला संस्कृत कुठेतरी जवळची आहे. ज्ञानेश्वरीचे वाचन करताना आपल्याला हा प्रभाव जाणवतो.
दुरितांचे तिमिर जाओ| विश्वस्वधर्म सूर्ये पाहो|
         जो जे वांछील तो ते लाहो|प्राणिजात||
हे साहित्य वाचताना आपल्याला धार्मिक साहित्य वाचल्याचा एक अनुभव येतो कारण या भाषेवर संस्कृतचा प्रभाव होता. महानुभाव पंथीय साहित्यात मराठीचा (आग्रहाने व आवर्जून) वापर असेल पण त्याचा व संस्कृतचा संबंध नाकारता येत नाही. नामदेवांच्या आरत्या, एकनाथी भागवत, आणि रघुनाथ पंडितांचे 'नल दमयंती स्वयंवर', तत्कालीन मराठी भाषेची उदाहरणे द्यायला एवढा ऐवज पुरा पडावा.
        मराठी भाषेवर असलेला हा संस्कृत भाषेचा पगडा एका टप्प्यावर स्थीर झाला. त्याला जशी नव्याने उदयाला आलेली लोकसंस्कृती कारणीभूत होती तशीच कारणीभूत होती तेंव्हाची नवी राजकीय व्यवस्था.
         याच काळात मराठी प्रांतात बहामनी मुसलमानी राजवट स्थिरावली. महाराष्ट्राचा नकाशा ध्यानात घेतला तर अहमदनगर (निजामशहा), गोवळकोंडा (कुतुबशहा), विजापूर (आदिलशहा) यांच्याच बरोबर बिदर, गुलबर्गा येथील राज्येही तितकीच महत्वाची होती. यापैकी निजामाच्या राजवटीत शासकीय भाषा मराठी होती. याचे कारण म्हणजे मराठी ही जनसामान्यांची भाषा होती. आता लोकांमध्ये राज्य टिकवायचे झाल्यास त्यांची भाषा आत्मसात करावीच लागणार आणि त्यांच्याशी काही प्रमाणात तरी जमवून घ्यावेच लागणार. (हेच मुघलांनी ओळखले पण आजचा गद्दाफी ओळखू शकला नाही.) पण मराठी भाषा आत्मसात करून ती कारभारात आणताना राज्यकर्त्यांनी शब्द मात्र सर्रास फारसी वापरले. आणि प्रशासन व लोकांमध्ये संवाद निर्माण होताना हीच भाषा रुजायला सुरवात झाली. (येथे "कोणत्याही काळात जेत्यांचे विचार हेच समाजाचे विचार ठरतात आणि समाज कालांतराने त्यांच्याच भाषेत बोलू लागतो" हा कार्ल मार्क्सचा सिद्धांत लागू पडावा.)
पुढे सर्व राज्यकर्त्यांनी आपली शब्दसंपदा व्यवहारात आणायला सुरुवात केली व लोकांनीही त्याला साथ दिली. 
          तत्कालीन मराठी ही इंडो आर्यन कुळातली भाषा होती. तिचे काही नियम होते. त्यांना धक्का ना लागता मराठी भाषेत नवे शब्द दिसू लागले. मराठीचे मूळ रुपडे बदलले नाही तिचा पोत मात्र बदलायला लागला.
        मराठी भाषेत व्याकरणिकदृष्ट्या झालेले बदल आपण समजावून घेऊ.
स्वनीम व्यवस्था: (म्हणजेच आपली सामान्य बाराखडी. स्वन म्हणजे ध्वनी)
फारसी भाषा ही अंतरश्वसित तर मराठी भाषा बहिरश्वसित. म्हणजेच फारसी भाषा बोलताना श्वास रोखून धरावा लागतो. मराठी भाषा बोलताना सोडावा लागतो. नवनवे फारसी शब्द मराठीत दिसू लागले पण ते बहिरश्वसित पद्धतीने. खालील उदाहरणे बोलकी आहेत असे म्हणता येईल.
|     फारसी भाषा (मूळ शब्द फारसी अर्थासकट)  |        मराठी भाषा (रुपांतरीत शब्द)  |        झालेला बदल  |   
|     जिक्र (कटकटीचे काम)  |        जिकीर  |        उच्चारात बदल  |   
|     फिक्र (परवाह)  |        फिकीर (चिंता- परवा)  |        उच्चारात बदल  |   
|     मुलाकात  |        मुलाखत भेट  |        (‘क’ चा ‘ख’ महाप्राण)  |   
|     गुनाह  |        गुन्हा  |        'ह' प्रकट स्वरुपात  |   
|     गवाही  |        ग्वाही साक्ष (मूळ अर्थ खात्री)  |        
  |   
आणखी काही मूळ शब्द व बदल.
|     फारसी भाषा (मूळ शब्द)  |        मराठी भाषा  |   
|     झिला  |        जिल्हा  |   
|     शाह  |        शहा  |   
|     सिपाही  |        शिपाई  |   
|     तपसील  |        तपशील  |   
|     जियादा  |        ज्यादा  |   
|     जागीर  |        जहागीर  |   
|     आबरू  |        अब्रू  |   
|     दर्मियान  |        दरम्यान  |   
|     पुंछ्ना  |        पुसणे (विचारपूस)  |   
अर्थ प्रक्रियेत काळाच्या ओघात झालेले बदल
|     शब्द  |        मूळ अर्थ  |        सध्याचा अर्थ  |   
|     दुकान  |        पसारा  |        विक्री केंद्र  |   
|     ग्वाही  |        साक्ष  |        खात्री  |   
मराठीत शिरलेले नवे प्रत्यय 
 
 
|     प्रत्यय  |        शब्द  |   
|     गिरी  |        गुलामगिरी, मुलूखगिरी, मुत्सद्देगिरी, गांधीगिरी  |   
|     दार  |         भालदार, चोपदार, दमदार  |   
|     ई  |        दिरंगाई, कुचराई  |   
|     गी  |        दिवानगी, मर्दानगी  |   
|     की  |        पावकी निमकी.  |   
       मराठीत शिरलेल्या या नव्या पर्वामुळे व्याकरण प्रक्रियेला धक्का लागला का?
या प्रश्नाचे उत्तर 'नाही' असे देता येईल.
   काही नवीन व्याकरणिक नियम जरूर शिरले पण मौजूद नियमांना धक्का लागला नाही. नवीन प्रत्यय व व्यवस्था आली. किल्ला --इ - पुरंदर याचे किल्ले पुरंदर असे नाव झाले तसेच सालाबादाप्रमाणे म्हणजेच मागील वर्षाप्रमाणे. यात 'साल' च्या मागे 'बाद' येतो आणि मराठीत मात्र 'मागील' हा शब्द 'वर्षा' च्या आगोदर येतो. 
त्याचप्रमाणे नवीन आलेल्या शब्दाला लिंग, विभक्ती आणि वचन मिळाले की त्याला त्या भाषेत स्थान मिळते उदा: टेबल. पुल्लिंगी प्रथमा विभक्ती, आणि एकवचन याच गोष्टी सर्व फारसी शब्दांना लागू होतात.
सामान्य रूप हा मराठी भाषेचा चा विशेष आहे. उदा: 'वेळ' या शब्दाला 'त' हा प्रत्यय जोडला की 'वेळेत' हा शब्द होती. या 'वेळ' या शब्दाचे 'वेळे' हे सामान्य रूप होते. तसेच किल्ला आणि किल्ल्याला.
    म्हणजेच मराठीचा साज बदलला, तिला दरबारी आब आला पण लहेजा मात्र तसाच राहिला. खऱ्या अर्थाने मराठी भाषा समृद्ध झाली . उपलब्ध शब्दांना अक्षरश: समांतर अशी एक नवी संपदा उभी राहिली
तरीही या सांस्कृतिक संक्रमणाचे काही परिणाम व्हायचे ते झालेच. मराठीचे रूपच पालटले आणि इंडो आर्यन कुळातली मराठी ही परसो आर्यन कुळातली होते आहे की काय अशी भीती निर्माण झाली
या परिस्थितीत बदल करण्यासाठी म्हणून शिवछत्रपतींनी मराठी शब्दकोश प्रकाशित केला. मूळ मराठी भाषेला संजीवनी देण्याचा हा प्रयत्न. आपल्या अष्टप्रधान मंडळाच्या मूळ मराठी नावांबरोबरच त्यांनी फारसी नावेही जोडली.
शिवछत्रपतींचे अष्टप्रधान मंडळ.
|     पेशवा -  |        पंतप्रधान  |   
|     मझुमदार -  |        अमात्य  |   
|     वाकीया नवीस वाकनीस  |        (मंत्री )  |   
|     सूर नवीस -  |        सचिव  |   
|     डबीर -  |        सुमंत  |   
|     सरनौबत -  |        सेनापती  |   
|     पंडितराव  |        
  |   
|     न्यायाधीश  |        
  |   
पण शिवशाहीच्या उत्तरकाळात हा प्रयत्न मागे पडला राज्य राखणे हीच मोठी जबादारी .पडली. येऊन बाजीरावाचा .पडली. येऊन घोडा तर अक्षरशः पायाला भिंगरी लावल्यासारखा सतत धावत होता भाषा संवर्धनासाठी वेळच मिळाला नाही आणि पुन्हा एकदा मराठी फारसीमय . झाली नाना फडणविसांची पत्रे याची साक्ष देतील. त्या काळची भाषाच मुळी मुन्साफिच्या हुद्द्यावर तुमचा तक्रूर केला आहे (न्यायाधीश पदावर तुमची नियुक्ती केली आहे) अश्या स्वरूपातली झाली. म्हणूनच आजच्या शासकीय मराठीत हे सर्व शब्द सरसकट आढळतात. तरीही आपण सहजपणे शब्दांचा संयोग केला उदा: रोजगार हमी योजना, जिल्हाधिकारी, तसेच नवीन शब्द शोधले. उदा: मंजूर करणे म्हणजेच पारित करणे. शहरप्रमुख म्हणजेच महापौर (हा शब्द सावरकरांचा) वेगवेगळ्या वेळी आपल्याला नवी उत्पत्ती करावी लागली.
आजची शासकीय मराठी (व आपल्याही व्यवहारातली)
फारसी शब्द मूळ मराठी शब्द
|     (शुरुवात ) सुरुवात  |        प्रारंभ  |   
|     आखिर अखेर  |        शेवट  |   
|     हमी  |        खात्री  |   
|     रोज  |        प्रतिदिनी.  |   
|     तारीख  |        दिन + अंक = दिनांक  |   
|     जबाबदारी  |        उत्तरदायित्व  |   
|     महसूल  |        राजस्व  |   
|     कर्ज  |        ब्रह्मस्व  |   
|     तपास  |        शोध  |   
|     फत्ते  |        विजय  |   
|     हार (शिकस्त)  |        पराभव  |   
|     याद -> यादी  |        सूची (सुचावे म्हणून केलेली)  |   
|     पैदास  |        उत्पत्ती  |   
|     पगार  |        मानधन  |   
|     जरूर  |        आवश्यक  |   
|     नुकसान  |        हानी  |   
|     नफा फायदा  |        लाभ  |   
|     खूब (खूप)  |        पुष्कळ  |   
|     जोर ताकद  |        बळ  |   
|     दर्जा  |        पातळी  |   
|     कायदा  |        नियम  |   
|     इमारत  |        -----  |   
|     अंदाज  |        अनुमान  |   
|     जकात  |        सीमा शुल्क  |   
|     (खास+गी) खासगी  |        वैयक्तिक  |   
|     कारवाई  |        कार्यवाही  |   
|     सरकार व शासन  |        राज्यकर्ते  |   
|     बाब  |        गोष्ट  |   
|     जमीन  |        भूमी  |   
|     जाहीर  |        घोषित  |   
|     रस्ता  |        मार्ग  |   
मराठी भाषेचा हा अवतार आपल्याला प्रामुख्याने पारिभाषिक शब्दांमध्ये दिसून येतो. एरवी आपल्याला संस्कृतप्रचुर मराठी भाषा दिसतेच. 
    शेवटी एवढेच नमूद करावेसे वाटते की मराठी भाषा श्रीमंत झाली आहे हे नाकारण्यात काहीच अर्थ नाही. आज धर्माच्या नावावर एकमेकांचा तिरस्कार करण्याची वृत्ती वाढली आहे. तेंव्हा हा समाजशास्त्रीय इतिहास डोळ्यासमोर आणल्यास उत्तम. तसेच आजच्या जागतिकीकरणाच्या युगात तर शेकडो शब्द मराठी भाषेत यायला उत्सुक असतील. गरज आहे ती केवळ त्याच्याकडे स्वागतपूर्ण दृष्टीने बघण्याची व त्या योगे या नव्या स्थित्यांतरला सक्षमपणे सामोरे जाण्याची. 
 
 
संदर्भ सूची
 भाषा विज्ञान वर्णनात्मक आणि ऐतिहासिक
 भाषा कुल – संकल्पना आणि मराठीचा उद्गम- अंजली सोमण
 मराठीचे ऐतिहासिक भाषाशास्त्र र. रा. गोसावी
 यादवकालीन मराठी भाषा – शं गो. तुळपुळे
 मराठी भाषेचा इतिहास. गं. ना. जोगळेकर
 मराठी भाषा उद्गम आणि विकास कु पां कुळकर्णी
 मराठी भाषेच्या व्युत्पत्तीचा इतिहास.
 ज्यूल ब्लॉक (Paris University)