Monday, April 27, 2015

इष्टापत्ती

शेजाऱ्यांशी कसं वागायचं हे कौटिल्याने केंव्हाच सांगून ठेवलंय परंतू जातपात पाळणारी असल्याने वैदिक संस्कृती इतकी बदनाम झालीये की हिंदू धर्मातल्या अनेकांना यात अनेक चांगल्या गोष्टी आहेत ही बाबच पचनी पडणे अवघड झाले आहे. आणि आपल्या बरीने ब्रह्मांडाचा आढावा घेणारी वैदिक संस्कृती पुरती अब्राहमण्यम झाली आहे. कौटिल्य अर्थशास्त्रात राजाने आपले राज्य कसे टिकवून ठेवावे याचा हा परिपाठ आहे. कोणाही सामान्य माणसाला मुळापासून हादरवून टाकणारे सिद्धांत यात आहेत. हे भावना वगैरे किंवा मुल्य, नैतिकता किंवा तत्वे वगैरे असं काहीच नसतं. प्रेम, त्याग, बंधुभाव निस्वार्थी आणि निर्लेप कार्य या राजासाठी भंपक गोष्टी आहेत असे कौटिल्य मानतो. राजा हा राजा आहे आणि त्याने राजासारखंच वागायला हवं असं यात सांगून ठेवलं आहे. प्राचीन भारतातल्या १६ महाजनपदांच्या काळात आपलं राज्य कसं कसं शाबुत ठेवावं याचे डावपेच चाणक्याने सांगितले आहेत. ते कुटील आहेत म्हणून याला कौटिल्य अर्थशास्त्र म्हटलं जातं. कौटिल्य अर्थशास्त्रात मंडळ नावाचा सिद्धांत आहे. राज्यांच्या सीमारेषा जेंव्हा एकमेकांना भिडलेल्या असतात तेंव्हा त्यांच्यात संघर्ष अटल असतो. अनेकदा हा संघर्ष जमिनीचा सुंदर सुपीक तुकडा किंवा पाण्याच्या प्रवाहावरून असतो. अश्या या शेजाऱ्यास अरी म्हणजेच शत्रू म्हणतात. भारत चीन, भारत पाकिस्तान तसेच भारत बांगलादेश हे संबंध कायम वादग्रस्त का याचे उत्तर आपल्याला येथे मिळते. पण शत्रू असणे ही कोणा एकाचीच मक्तेदारी नाही. शत्रूचेही त्याच्या शेजाऱ्याशी वाद असू शकतात. उदा: पाकिस्तान इराण, पाक अफगानिस्तान, चीन जपान, चीन व्हिएतनाम आणि अगदी चीन मंगोलिया सुद्धा. म्हणून शेजाऱ्याचा शेजारी म्हणजे अरी अरी म्हणजेच शत्रूचा शत्रू म्हणजेच आपला मित्र बनायला हरकत नसते. आता आपल्याला कळलं असेल की चीन पाकिस्तान संबंध इतके मधूर का असतात आणि त्या इराणबरोबर आपण उत्तम संबंध का ठेवायचे. मोदींच्या जपान भेटीमागे, राष्टपती प्रणव मुखर्जी यांच्या व्हिएतनाम भेटीमागे हेच धोरण असतं. पण सरसकट कोणत्याही देशाच्या परराष्ट्र धोरणाला हे लागू होत नाही. अनेकदा अगडबंब शेजारी असेल आणि तो शत्रू असेल तर त्याच्या आणि आपल्या मध्ये एक मध्यम राष्ट्र असायला हवे. परराष्ट्र धोरणात याला बफर स्टेट म्हणतात. यामुळे शत्रू जर उद्या चाल करून आला तर ,मधल्या बफर राष्ट्रामुळे हे आक्रमण लांब राहतं. म्हणूनच चीन आणि भारताच्या मध्ये नेपाळ, भूतान आणि पूर्वीचा सिक्कीम ही छोटी छोटी राज्ये ठेवावी लागतात. पण या राज्यांनाही वाऱ्यावर सोडून चालत नाही. सतत त्यांना गोंजारत बसावे. त्या देशात वातावरण कायमच आपल्याला अनुकूल ठेवावे. त्या देशाला सतत तो स्वतंत्र असल्याचे भासवत प्रत्यक्षात मात्र त्याला आपल्या कच्छपी लावून ठेवायचे असते. हे सगळं का तर आपल्या देशाच्या सुरक्षेसाठी. हे सगळं का तर आपल्या देशाच्या सुरक्षेसाठी. भारतची लोकसंख्या जगाच्या १७ टक्के असल्याने मानवतेच्या दृष्टीकोनातून वगैरेही भारताला हा धडा आत्मसात करायला हरकत नाही. या आघाडीवर कामगिरी काय आहे? आपले सगळे शेजारी आपल्याबद्दल राग बाळगून असतील तर तो दोष आपला आहे . वाईट फार फार तर एक किंवा दोन असू शकतात. सगळे वाईट आणि मी एकटा मर्यादा पुरुषोत्तम असूच शकत नाही. नेपाळमध्ये कम्युनिस्ट सरकार येतं भर सोडून चीनबरोबर संसार थाटायला जातं. पशुपतीनाथ मंदिरात भारतीय पुजाऱ्यांनी पूजन करायची परंपरा असताना त्या पुजाऱ्याना मारहाण करून तिकडून हाकलून दिलं जातं. शेवटी तिकडच्या जनतेने त्या पुजाऱ्याना परत स्थानापन्न केलं. नेपाळ आणि भूतानमध्ये मिळून एक लाख मेगा watt वीज निर्मितीची क्षमता आहे. या देशाचा आपल्याला हाही उपयोग आहे. ओता रे ओता नेपाळमध्ये मदत ओता, पैसा, अन्नधान्य, कपडे, माणसं सगळं ओता. आपत्ती आलीये त्यांच्यावर, जबाबदारी आहे आपल्यावर. नेपाळ, भूतान, बांगलादेश, श्रीलंका, म्यानमार, मालदीव, अफगानिस्तान ही आपली लहान भावंडं आहेत. त्यांच्याकडून काहीही परतावा न मागता त्यांना हवं ते द्या. जुना साचलेला वाईटपणा आणि अढी निवळायची उत्तम संधी या आपत्तीमुळे आलीये. जुना धागा पुन्हा मजबूत करा. नेपाळच्या मूर्ख कम्युनिस्टांना हे आवडणार नाही आणि इकडचे बरेच समाजवादी 'नेपाळला मदत करता मग आमच्या शेतकऱ्यांना का नाही?' असा प्रश्न करतील. लक्ष देण्यासारखी ही मंडळी नाहीत. यांना उत्तर देणं म्हणजे आपलंच हसं करून घेणं. आत्तापर्यंतच्या जबरदस्त कामगिरीबद्दल भारत सरकारचं हार्दिक अभिनंदन. मुख्य म्हणजे भारताच्या प्रसारमाध्यमांना मोठा सलाम. मतभेद विसरून देशहितासाठी एकत्र आल्याबद्दल.