Monday, February 16, 2015

अर्थव्यवस्था विरुद्ध गुणवत्ता

२००४ साली भारतीय संघ पाकिस्तान दौऱ्यावर गेला असताना शहीद आफ्रिदीने भारतीय कर्णधार सौरभ गांगुलीला आपल्या घरी बोलावलं. गांगुली सपत्निक आफ्रिदीच्या घरी गेल्यावर त्याला सरप्राईझ मेन्यू लक्षात आला. पण सगळ्यात मोठा धक्का आफ्रिदीसाठी होता, कारण ब्राह्मण असल्याने सौरभ गांगुली पूर्णपणे शाकाहारी होता. आफ्रिदीने सगळा बेत बाजूला सारून गांगुलीसाठी जवळच्या चांगल्या हॉटेलमधून डाळ मागवली. भारत पाकिस्तान सामन्यांवरून सध्या आफ्रिदीच्या मातेवरून शिव्यांचा जो उत आलाय तो मराठी समाजासाठी लज्जास्पद आणि बालिश पातळीचा आहे. आशिया कप मध्ये आफ्रिदीने धुवाधार खेळत पाकिस्तानला सामना जिंकून दिल्याचा राग अजूनही आमच्या मनात आहे. पण तो सामना आपण विकेटकीपर दिनेश कार्तिकच्या झोपा काढण्यामुळे गमावला होता हे कोणीच आठवत नाही. क्रिकेटपटूने २४ तास क्रिकेट खेळावं किंबहुना त्या पातळीवर राहावं हीच आमची अपेक्षा असते. त्या सगळ्यापलिकडे तो एक माणूस असून त्याला काही एक वैयक्तिक आयुष्य आहे हेच आपण समाज म्हणून विसरतो. ऐंशीच्या दशकात भारताच्या हॉकी कर्णधाराने पाकिस्तानी कर्णधाराबरोबर आपली दारूच्या पेल्यातली मैत्री आहे हे उघड केल्यावर भारतात तीव्र प्रतिक्रिया उमटली होती. १९९६ साली वासिम अक्रम आणि महम्मद अझरूद्दीन बिर्याणी खाताना दाखवले होते. त्यानंतर अझर पाकिस्तानविरुद्धच वाईट का खेळतो असा मूर्ख प्रश्न विचारला गेला होता. 'चक दे इंडिया' चित्रपटात हताश भारतीय कर्णधार कबीर खानशी पाकिस्तानी कर्णधार येउन फक्त हात मिळवतो आणि नेमकी तीच पोझ जगजाहीर होऊन कबीर खानने जाणून बुजून स्वत: स्ट्रोक घेऊन तो चुकवला असं काहूर उठतं. कबीरखानचं करियर संपतं. मीर रंजन नेगी या मुस्लिम भारतीय कर्णधाराबरोबर हे घडलं होतं. समाज इतका असहिष्णू का होतो? १९९६ साली वासिम अक्रम भारताविरुद्ध उपांत्यपूर्व सामना खेळू शकला नाही तेंव्हा पाकिस्तान हरल्यावर त्याच्यावर गद्दारी केल्याचा आरोप झाला होता. आपल्याला फाळणी आणि पुढे दहशतवादाचा शाप लागलाय म्हणून पाकिस्तानशी सामना म्हणजे युद्धच असा काहींचा युक्तीवाद असेल. जगभरात अनेक मुस्लिमांना पाकिस्तानचा पराभव हा इस्लामचा पराभव वाटतो. १९९० च्या दशकात भारतीय संघ पाकिस्तानशी सातत्याने हरायचा. त्यावेळचे पंच फितूर असायचे, एकदा तर अंधारात सामना खेळवला गेला होता. पण शुक्रवार म्हणजे भीतीचा वार ही खुणगाठच मनाशी बांधलेली. शारजा म्हणजे हारजा आणि शुक्रवार म्हणजे झुम्मा म्हणजे पाकिस्तानला थेट अल्लाचा आशीर्वाद हेच मनाशी धरून भारतीय संघ कोसळायचा. मग ह्या शुक्रवारी अझर नीट का खेळत नाही किंवा ह्याच शुक्रवारचा सचिन तेंडुलकरला फरक का पडत नाही हे प्रश्न आपण पाडून घेतलेच नाहीत. पुढे काळ असा आला की भारताची अर्थव्यवस्था बदलली आणि आत्मविश्वासाने भरलेले खेळाडू येउन मिळाले. उत्तम, अनुभवी पण घाबरट खेळाडूंनी कच खाल्ली आणि सौरभ गांगुली, राहुल द्रविड, लक्ष्मण संघात आले. पुढे वीरेंद्र सेहवाग, झहीर खान, युवराज सारखे अरे ला कारे करणारे खेळाडू आले. कोणत्याच भारतीय कर्णधाराने सद्गुणविकृती दाखवत यांना झापले नाही. गांगुलीने पाकिस्तानला शुक्रवारी पाकिस्तानात डावाने हरवलं. आजच्या पिढीला शुक्रवार, शारजा ह्या गोष्टी सांगितल्या तर आपल्याशी ते बोलणार नाहीत. आज जी पिढी चाळीशीतली आहे त्यांना ह्या गोष्टी आठवून हसायला येत असेल. भारत महासत्ता होण्याचा क्षमतेचा होणे आणि भारतीय क्रीडा क्षेत्रात वाहू लागलेले नवे वारे यात निश्चितच संबंध आहे. रविवारी जे झालं तो नव्या ताज्या दमाच्या पोरांचा उरूस होता. २००४ ला 'हिस्ट्री मीन्स लिट्टील फॉर मी' ह्या गांगुलीच्या विधानाने आमची मानसिकता बनवून दिली. पाकिस्तानचे खेळाडू तेच विसरले होते. गेली काही वर्षे भारताविरुद्ध त्यांची देहबोलीच अपराध्याची होते. पण समाजमन म्हणून आमची काही प्रगती झालीये का? पाकिस्तानला हरवल्यावर जो जल्लोष झाला तो कीव करण्याच्या पातळीचा होता असं म्हणता येईल. आम्ही फटाके फोडले आणि पाकिस्तान्यांनी टीव्ही. त्यांनी भारताशी स्वत:ची तुलना करावी हे समजू शकतं पण भारताचं काय? शिकारी कुत्र्याने उंदीर मारल्यावर जल्लोष झाला तर उंदराला उगीच मान दिल्यासारखं असतं. परवाचा सामना हा निव्वळ नैसर्गिक गुणवत्ता विरुद्ध आर्थिक महाव्यवस्था असा विषम होता. गेल्या २२ वर्षात या देशाने जी झेप घेतली तीच जर कायम राहिली तर हेच होत राहणार, सामने निश्चित नाहीत पण निकाल मात्र निश्चित आहेत. आनंद कोणत्या गोष्टीचा बाळगायचा हे ज्याचं त्याच्यासाठी. ह्या प्रकरणी समाज माध्यमे अधिक पुढाकार घेऊ शकतील, पण तीच सध्या मोदी पवारांना बारामतीत जाऊन भेटले ह्या गोष्टींवरून राजकीय आखाडे बांधतायत. सदा न कदा निवडणुकांतच राहणारा विचारवंत वर्ग आणि भारत पाकिस्तानला तोडीस तोड प्रतिस्पर्धी मानणारे आपण लोक. देशाची प्रगती होईल पण समाजाची निकोप प्रगती यातून होणार नाही.

No comments:

Post a Comment