Monday, June 20, 2016

योगग्रस्त आणि योगव्याप्त

शंभर मीटर धावणाऱ्याला योगाची गरज नसेल. त्याला साडे आठ सेकंदात अंतर गाठायचंय. पण म्हणून त्याने मेरेथोन गाजवायची नसते असा नियम नाही. पण तिकडे धावायचं असेल तर नुसता फिटनेस उपयोगी नाही तर चिरंतन म्हणजे सस्टेनेबल फिटनेस उपयोगी असतो. त्यासाठी योग महत्वाचा. योग हा तात्कालिक फिटनेसपेक्षा फिटनेसच्या स्थायीपणाला म्हणजे सस्टेन असण्याला अधिक वाव देतो. त्यामुळे समझे यार!! म्हणून त्याला खारीज करायची गरज नाही. केंद्र सरकारच्या योगाला पुढे आणण्यामागे हिंदुत्ववादी अजेंडा आहे की नाही हा मोठा मुद्दा नाही. योग ज्या प्रमाणात जगभर पसरलाय त्याला आता धर्माच्या दुपट्यात गुंडाळणं अशक्य आहे. त्यामुळे हा अजागळपणा बाजूला असू दे. राजीव गांधींनी भारतात माहिती तंत्रज्ञान क्रांती आणायचा प्रयत्न केला. त्या काळात विमानात laptop घेऊन बसलेल्या राजीव गांधींचे फोटो आहेत. नेता द्रष्टा असेल तर देशाला कार्यक्रम देतो. त्या काळात राजीवना अनेक पातळ्यांवर मोठा विरोध सहन करावा लागला. स्वदेशी जागरण नारा लावणाऱ्या विरोधकांनी देश परकीय शक्तींच्या ताब्यात जात असल्याचा आक्रोश केला तर एक संगणक दहा जणांची कामे करतोय म्हणजे तो दहा लोकांचा रोजगार हिरावून घेणार म्हणून डाव्यांनी छाती पिटून घेतली. संगणक क्रांती काही थांबली नाही. एकेकाळी फालतू कल्पना अंगी बाळगत जगणारा भारत दीड दशकात माहिती तंत्रज्ञान महासत्ता झाला. मुख्य म्हणजे ज्या शक्तींनी विरोध केला त्याच शक्ती त्याच तंत्रज्ञानाचा उपयोग करत चार चार वेळा सत्तेत आल्या. म्हणूनच पक्षीय आणि धर्मिक अभिनिवेश बाजूला ठेवून आणि कोणताही अभ्यासू किंवा माहितगार असल्याचा आव न आणता योग या प्रकाराकडे सहज बघायला हवं. ठाण्यातले एक प्रसिद्ध योगगुरू म्हणतात "वी आर फर्स्ट क्लास ब्रेन्स, कॅरीड इन द थर्ड क्लास बॉडीज". शक्ती म्हणजे क्षमताच नसेल तर सगळंच शहाणपण व्यर्थ आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे समाजाला योगदान देऊ न शकणारे खंडीभर आहेत. अकाली मृत्यू आलेले तर अनेक. "शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ" वगैरे सगळं ठीक आहे. पण बुद्धिमान दुर्बलतेपेक्षा किमान बुद्धी आणि धडधाकटपणा कधीही चांगला. त्यामुळे "शरीरमाध्यम खलु सर्व साधनं". माहिती तंत्रज्ञानासारखाच याचा परिणाम बघायला कदाचित दशक लागेल. तरुणांना भुरळ पाडण्यासाठी योग नाही. त्यापेक्षा पाच किलोमीटर धावणं कधीही चांगलं असा विचार तरुणाई करेल. (म्हणूनच ती रसरशीत धडपडी तरुणाई). तरीही, ज्यांना पटणार आवडणार नाही त्यांना एक सल्ला. मोठ्या वेगाने सलग बराच काळ पळण्यापेक्षा, पाच सहा मिनिटासाठी विशिष्ट मोठ्या वेगाने पळाल्यावर काही क्षण विश्रांती घ्यावी लागते. दोन मिनिटे हळुवार चालल्यानंतर पुन्हा एकदा आधीपेक्षा जास्त वेग पकडावा लागतो. या सगळ्या नादात उर फुटायची वेळ येऊ शकते. म्हणून दीर्घ श्वास घेऊन किंचित रोखून हळुवार सोडवा लागतो. एकशे सत्तर ऐशीपर्यंत गेलेले ठोके दोनच मिनिटात एकशे दहा किंवा शंभरवर आणायचं कसब अंगी बाणवावं लागतं. नाहीतर अपेक्षित लक्ष्य गाठता येणार नाही. कारण हृदय साथ देणार नाही. योगाची गरज तिथे आहे. हे सांगायचं कारण म्हणजे या सगळ्या नादात आपल्या हृदयाचा वेग सातत्याने भन्नाट असून चालत नाही. २२० ठोक्यान्मधून आपलं वय वय वजा केल्यावर जी संख्या येईल ती आपल्या ठोक्यांची जास्तीत जास्त संख्या असावी. (उदा: वय जर २५ असेल तर २२० - २५ = १९५ किंवा २२० - ३०= १९०) ती सुद्धा क्वचितच. कारण सातत्याने हा आकडा गाठणे किंवा ओलांडणे म्हणजे हृदयविकाराला हृद्य आमंत्रण. २२० ठोके हे सर्वाधिक म्हणजे जन्मलेल्या बाळाचे असतात. म्हणजे जस जसं वय वाढत जाईल तास तसं हृदय कमी धडधडायला हवं. कसलेल्या खेळाडूंचा ठोक्यांचा वेग साठ ते पासष्ठ असतो. नैसर्गिक वेग जितका वेग कमी तितकी हृदयाची वेगाला साथ द्यायची क्षमता जास्त. म्हणजेच योगाची सवय असल्यास केवळ वेग नव्हे तर स्थायी वेग पकडता येतो. थोडक्यात धावणं वन डे असेल तर योग कसोटी सामना आहे. आणि सातत्याने आयपीएल गाजवलेले खेळाडूसुद्धा कसोटी सामने खेळणारे आहेत हे सत्य आहे. जाता जाता एक किस्सा. २०११ साली नोवाक जोकोविक आणि राफेल नडाल यांच्यात आतापर्यंत सर्वाधिक लांबलेला अंतिम सामना झाला. सामन्याच्या निकालापेक्षा प्रेक्षक आणि जग अवाक झालं ते दोघांची शारीरिक क्षमता पाहून. तासन तास खेळायची क्षमता तुम्ही मिळवली कुठून? या प्रश्नाला नडालने फार सुंदर उत्तर दिलं. सामन्यात जेंव्हा जेंव्हा आम्ही खेळत नव्हतो तेंव्हा तेंव्हा आमचा हृदयाचा वेग ७२ पर्यंत येत होता. आम्हाला पुढे खेळायला उर्जा मिळायची. श्वास रोखून धरायचा आणि हृदयाचे ठोके नैसर्गिकरित्या नियंत्रणात ठेवायचे हे आम्हाला जमलं.… त्यासाठी योगाची प्रचंड मदत झाली. *****खालील छायाचित्रात इस्रायलचे निर्माते आणि पहिले पंतप्रधान डेव्हिड बेन गुरियन

No comments:

Post a Comment