Friday, July 29, 2016

फ्रॉम टिळक टू गांधी 2

महात्मा गांधींना कोणी राजकीय दृष्ट्या सज्जन वगैरे नेता म्हणणार तर इतिहासाची माहिती असूनही ज्ञान अपुरं पडतंय याची खात्री व्हावी. राजकारण्याने बिल्डर व्हावं किंवा बिल्डरने राजकारणी व्हावं, सिंधी किंवा मारवाड्याने सी ए व्हावं, वेस्ट इंडियन तरुणाने खेळात करियर करावं, ईशान्य भारतातल्या तरुणाने लष्करात अधिकारी व्हावं ही जितकी डेडली समीकरणं असू शकतात तसलाच प्रकार म्हणजे गुजराथी वैश्य समाजातल्या तरुणाने बॅरिस्टर व्हावं आणि वर राजकारणात यावं. गेल्या लेखात आपण लोकमान्यांचा जीवनपट मांडताना त्यावेळेस गांधीजी कुठे होते हा प्रश्न उपस्थित केला होता. १५ वर्षांच्या वास्तव्यानंतर गांधीजी दक्षिण आफ्रिकेतून परत आले. ते नसते आले तर कदाचित तिथल्या महत्वाच्या अनिवासी भारतीयांपैकी एक झाले असते. गांधी हे पात्र झेपण्यासाठी एकच प्रसंग पुरेसा आहे. तत्कालीन दक्षिण आफ्रिकन सरकारने ख्रिस्तेतर पद्धतीने विवाह केलेल्यांची विवाह नोंदणी रद्द करण्याचा निर्णय घेतला. "सदर विवाहामुळे आपली पत्नी ही आपली पत्नी ना राहता आपली रखेल होईल" असा हुंकार भारतीयांमध्ये उमटला. सर्वच हिंदू मुस्लिम एकत्र आले त्यांना गांधीजींनी आपण शांततामय मार्गाने परंतु ठाम विरोध करूया असे सुचवले. "कदाचित ते धमकावतील, धक्काबुक्की करतील, जीवघेणी मारहाणही करतील. त्यातून त्यांना माझा जीव घेता येईल परंतु माझी संमती घेता येणार नाही", असं म्हणत गांधीजी स्वतः त्या कायद्याची होळी करायला पुढे गेले आणि ब्रिटिशांचे दांडुके सोसून आले. गांधीजींबद्दल काही अत्यंत महत्वाचे आक्षेप घेतले जातात. त्यांचे निराकरण करायचा एक छोटासा प्रयत्न. गांधीजींनी भारतीय लोकांना मवाळ बनवलं. हा एक लाडका आक्षेप आहे. किंबहुना लोकमान्य टिळकांनंतर गांधीजींनी भारतीय स्वातंत्र्य चळवळ मवाळ बनवली हा अत्यंत लाडका आरोप. मुळात मवाळ पंथीयांना बुद्धिवादी म्हणून मान्यता होती परंतु त्यांना लोकनेते म्हणून तितका पाठींबा नव्हता. सभांना गर्दी येत नसे आणि मुख्य म्हणजे जनतेला यांच्याकडून कोणताही विशेष कार्यक्रम मिळालेला आढळत नाही. "बळवंतरावांच्या मनगटात ती ताकद असल्यामुळे त्यांना या गोष्टी शक्य होतात" हे महादेव गोविंद रानडे यांनी सांगून ठेवले आहे. त्यामुळे मवाळ नेत्यांची ब्रिटिशांना काही उलट सुलट बोलायची अजिबात टाप नव्हती. विनंत्या, गाऱ्हाणी, सभा हे सगळं करून जे काही मिळतं त्यावर आनंदी राहायचा मवाळ नेत्यांचा कार्यक्रम असे. आधी समाज सुधारणा की राजकीय स्वातंत्र्य? यावर लोकमान्य टिळक आणि मवाळ नेते यांच्यात झडलेले वाद सर्वांनाच ठाऊक आहेत. इकडे मवाळ नेत्यांविषयी कटुता बाळगण्याचं कारण नाही. त्यांनी चळवळीला बौद्धिक अधिष्ठान दिलं. दादाभाई नौरोजी यांचं 'पॉव्हर्टी अँड अनब्रिटिश रुल इन इंडिया' असो किंवा महादेव गोविंद रानडे यांचं 'मराठी सत्तेचा उत्कर्ष' हे आर्थिक अभ्यास असलेलं ग्रंथकाम असो. या मवाळ नेत्यांनी काँग्रेसची संस्थात्मक आणि बौद्धिक पायाभरणी केली हे निश्चित. गांधीजींनी हे सगळे वादच निरर्थक ठरवले. मवाळ नेत्यांचा समाजसुधारणांचा कार्यक्रम त्यांनी आपला मानला. गोपाळ कृष्ण गोखले यांच्या सल्ल्यानुसार त्यांनी भारतभ्रमण करून परिस्थिती समजून घेतली. पण त्याचवेळेस जहाल नेत्यांचे कार्यक्रमही हाती घेतले. नेता मोठा असेल तर कार्यक्रम देतो. टिळकांनी चतुःसूत्री कार्यक्रम दिला. गांधीजी त्यालाच पुढे घेऊन गेले. टिळकांच्या स्वराज्य सूत्राला गांधीजींनी ग्रामस्वराज्यची जोड दिली. टिळकांच्या राष्ट्रीय शिक्षणाला गांधीजींनी नायी तालीम द्वारे नवा आयाम दिला. हिंदू मुस्लिम ऐक्य, स्वच्छता, कमवा आणि शिका कमवा तसंच स्वतः तयार करा मगच उपभोग घ्या ही शिकवण गांधीजींनी दिली. बहिष्कार म्हणजे गांधीजींची असहकार वृत्ती होती तर स्वदेशीचा मंत्र गांधीजींनी चरख्याच्या माध्यमातून जपला. ब्रिटिशांचे कपडे बहिष्कार म्हणून वापरात जाऊ नका. पण पुढे जाऊन स्वतःच स्वतःचे कपडे तयार करत जा, असा संदेश देत या चतुःसुत्रीला गांधीजींनी अर्थकारणाची जोड दिलेली आढळते. भले मग त्यात काही चूक वाटो. अर्थकारण चुकीचं असणं म्हणजे अर्थकारण नसणं असं होत नसतं. मवाळांचे मार्ग सनदशीर म्हणजे कायदेशीर होते. गांधीजींनी कायदेभंगाची हाक दिलेली आढळते. फक्त ही हाक सविनय होती. त्यामुळे गांधींनी लोकांना मवाळ बनवले हा आरोप खोटा असून लोकांना सविनय म्हणजे शांततामय मार्गाने आंदोलन करायला भाग पाडले. आंदोलन हा गाभा टिळकांच्या राजकारणाचा होता. मवाळ नेत्यांचा तो पिंडच नव्हता. (आयुष्याच्या शेवटच्या दिवसांमध्ये दादाभाई नौरोजीसुद्धा जहाल झाले यातून मवाळ नेत्यांची हतबलता दिसत नाही काय?). या शांततामय मार्गाची काय गरज होती? लोक शांततामय मार्गाने आंदोलन करत असले तर सरकारला विशेष कारवाई करता येत नाही. ब्रिटिश सरकारमधल्या अनेक घटकांमध्ये विवेक शाबूत होता. जालियनवाला बाग हत्याकांड घडवणारा डायर चौकशीला समोर गेला होता. (त्यावर भारतीय बाजूने अहवाल गांधीजींनीच तयार केला होता). त्यामुळे सरसकट गोळीबार आणि हाणामाऱ्या सरकारला करता येत नसत किंबहुना त्याची गरज नव्हती. परंतु ज्यावेळी चौरीचौरा पोलिस चौकी जळीत प्रकरण झालं तेंव्हा गांधीजींनी असहकार चळवळ तडकाफडकी मागे घेतली. कारण अश्या घटनांमुळे सरकारला बंदुकी चालवायला संधी मिळत असते आणि जर त्यात लोक मोठ्या प्रमाणावर बळी पडले तर त्यामुळे त्यांच्या मनोधैर्यावर परिणाम होऊन पुढे चळवळीतल्या सहभागाची शक्यता मावळू शकते. आपल्याच करांमधून तयार झालेल्या पोस्ट ऑफिसेस, रेल्वे, रस्ते यासारख्या पायाभूत सुविधा बॉंब लावून का उडवायच्या? या अश्या मार्गांतून वर आलेली व्यक्ती लोकशाही मानणारी असेल याची काही हमी आहे का? या अश्या अनेक कारणांमुळे गांधीजींनी ही चळवळ शांततामय मार्गांनी पुढे रेटली. सत्याग्रहींचे जत्थे च्या जत्थे जात होते, ब्रिटिशांचा मार खाऊन परतत होते. त्यातल्या कोणीही ब्रिटिशांवर हात उचलला नाही. अनेक गांधीविरोधकांना हे लोकांना नामर्द बनवल्याचं लक्षण वाटेल. परंतु जात, भाषा, धर्म आणि प्रांत यावर लोकांची माथी भडकवून त्यांना दगड उचलून दंगली करण्यास प्रवृत्त करणे तुलनेने सोपे असते आणि असे नेते खचाखच पडलेले आहेत हे लक्षात घेतलं तर लोकांना "गप्प बसा, मार खा, प्रत्युत्तर देऊ नका" असं सांगून लढायला उभा करणारा गांधीबाबा नक्कीच वेगळा ठरतो. म्हणूनच भावतो. महात्मा गांधींवर होणारे 'मुस्लिम लांगुलचालन' आणि 'गांधीजींनी कोणतीही चळवळ अंतापर्यंत चालवली नाही' हे आरोप पुढच्या लेखात अभ्यासू.

No comments:

Post a Comment