Friday, July 29, 2016

फ्रॉम टिळक टू गांधी -३

महात्मा गांधींवर केल्या गेलेल्या काही आरोपांवर गेल्या लेखात चर्चा झाली. (समाचार घेतला हा वाक्प्रचार नको, गांधीजींना आवडणार नाही) आज काही आरोपांवर करायला हरकत नाही. 'गांधीजींनी कोणतीही चळवळ अंतापर्यंत चालवली नाही' आणि 'मुस्लिम लांगुलचालन' हेच ते प्रमुख आरोप. गांधीजींनी कोणतीही चळवळ अंतापर्यंत चालवली नाही हा आरोप शंभर टक्के खरा आहे. सर्वात धडधडीत उदाहरण म्हणजे असहकार चळवळ. लोकमान्य टिळकांच्या मृत्यूच्या दिवशी ही चळवळ सुरु झाली. या टायमिंगबद्दल गांधीजींना दाद द्यावी तितकी थोडी. कारण लोक हे भावनांच्या अत्त्युच्च शिखरावर असताना एखाद्या विधायक कार्यासाठी त्याचा वापर करणं यासारखा मास्टर स्ट्रोक नाही. पण १९२२ सालीच चौरीचौरा पोलीस चौकी जाळली गेली आणि गांधीजींनी तडकाफडकी ही चळवळ मागे घेतली. उभ्या काँग्रेसमध्ये प्रत्यक्ष फूट पडली. फक्त पक्ष १९०७ सारखा जहाल मवाळ सारखा फुटून दुभंगला नाही. बरेचसे ज्येष्ठ आणि तरुण नेते या आकस्मिक निर्याणावर नाराज होते आणि हट्टी गांधीजी कोणाचंही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. मोतीलाल नेहरू, देशबंधू चित्तरंजन दास, विठ्ठलभाई पटेल, न. चिं. केळकर, हुसेन शाहिद सुरावर्दी आणि सुभाष चंद्र बोस हि त्यातली काही बडी नावं. लोक देशभक्तीने पेटून उठले आहेत, हीच ती वेळ हाच तो क्षण आपले मनसुबे पूर्ण करण्याचा, असा विचार जवळपास सर्वच काँग्रेस नेत्यांमध्ये होता. परंतु गांधीजींना मानणारा तरुण वर्ग शिस्त म्हणून गांधीजींचं म्हणणं मान्य करता झाला. यामध्ये होते जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल आणि डॉ. राजेंद्र प्रसाद ही काही महत्वाची नावं. स्वराज्य पक्ष जन्माला आला तो या पार्श्वभूमीवर. या पक्षात गांधींच्या विचाराशी सहमत नसलेले लोक सामील झाले. विधिमंडळात शिरून काहीतरी करून दाखवायच्या उर्मीने स्वराज पक्ष निवडणुका लढवून गेला आणि यश मिळवता झाला. सायमन कमिशन ही याच पक्षाची देन. अर्थात तीही फसवणूक झाली हा भाग वेगळा. असहकार चळवळ मागे घेतली गेली कारण चौरीचौरा पोलीस चौकी जाळल्यानंतर मोर्चेकऱ्यांवर हल्ले करण्याचं निमित्तच ब्रिटिश शोधात होते. लाखो माणसं समोर फक्त हातात झेंडे, बोर्ड घेऊन उभी आहेत, काहीच करत नाहीयेत फक्त शांतपणे चालतायत, अश्या वेळेस लाठीमार करणं गरजेचं नसतं. त्यामुळे शांततामय आंदोलन हे न जाणवणारा परिणाम घेऊन येत असतं. पोलीस चौकी जाळली किंवा नुसतं खळ्ळ खटाक केलं की पोलिसांचं काम सोपं होऊन जात असतं. पोलीस जर मग्रूर झाले तर पुढच्या आंदोलनात लोकसहभागाची शक्यता कमी होऊ शकते. शिवाय गांधीजी चळवळ मागे घेता येईल याची वाटच बघत होते असं मत मांडता येईल. कारण घर, शाळा, नोकऱ्या दुकाने आणि तत्सम उद्योग सोडून लोक चळवळीत सहभागी असतात. एका मर्यादेपुढे पोटाला टिचकी बसली किंवा दंडुके खाऊन आजारपण किंवा आलं अपंगत्व आलं तर आयुष्याची वाताहत होत असते. त्यामुळे गांधीजींचा हा निर्णय योग्यच होता. "जो उंचा सुनते है, उनके लिये धमाकोंकी जरुरत होती है" हा भगतसिंगांचं वाक्य अतिशय स्फूर्तिदायी वाटतं. परंतु अभ्यासूंनी जरा भगतसिंगाच्या मनोगतावर नजर टाकावी. आपण बॉंब फोडून, हत्या करून २३ व्य वर्षी फासावर जातोय आणि यापैकी काहीच ना करणारे जिवंत आहेत आणि आपलं कार्य करतायत हे दुःख भगतसिंगांनी तुरुंगात मांडून ठेवलंय. हे भगतसिंग सविनय कायदेभंग चळवळ मागे घेतल्याबद्दल नाराज होते. (अनेकांनाबंदुकीचा मार्ग सोयीचा वाटतो. भगतसिंग कम्युनिस्ट होते हे अनेकांना ठाऊक नसतं.). या भगतसिंगांची फाशी टळावी म्हणून गांधींनी आयर्विनला साकडं घातलं. त्याने ते ऐकलं. तोंडी आदेश दिला. पण तो लेखी पोहोचण्याच्या आधीच भगतसिंगला फाशी दिली गेली. आणि म्हणूनच तो पळाला हे सिद्ध करण्यासाठी प्रेताची विल्हेवाट लावली गेली. चले जाव चळवळीतले गांधी पूर्णपणे वेगळे होते. सुरवातीला जमेल तसं काहीतरी करा म्हणणारे गांधीजी 'करा किंवा मरा' म्हणायला आले. 'माझ्या दोन वाक्यांमध्ये फरक असेल तर माझं नंतरचं वाक्य योग्य माना' हे त्यांनीच लिहून ठेवलं आहे. काळ बदलतो, मतं बदलतात. बदलावीच लागतात. 'चले जाव' काही महिन्यात संपली, पुन्हा सुरु झाली, भूमिगत झाली आणि उत्तरोत्तर हिंसक होत गेली. गांधीजींच्या हातून नेतृत्व निसटायचा काळ हाच. पण ते झालं नाही. का झालं नाही? गांधीजी का अजरामर झाले? तीन गोळ्यांनी एक वृद्ध शरीर संपवलं पण विचारसरणी का नाही संपली? आता गांधीजींनी मुस्लिम लोकांचे लाड केले या मुद्याकडे वळूया. हिंदु मुस्लिम भांडणाचा गैरफायदा इंग्रजांनी घेऊ नये म्हणुन गांधीजी धडपडत होते. हिंदु - मुस्लिम प्रश्नाबाबत उदार भूमिका घेतली पाहिजे असे कोंग्रेसचे म्हणणे होते. दोन मुस्लिमांना तीन मतांचा अधिकार देणारा कायदा लखनौ करारात लोकमान्य टिळकांनी उचलून धरला. मुसलमानांच्या लांगूलचालनास सुरवात झाली ती तिथून. अर्थात तेंव्हा पुढे देश तुटेल हा विचार लोकमान्य टिळकांच्या मनात आला नसणार. गांधीजी वगळता सारेच काँग्रेस नेते मुस्लिमांबाबत उदार मतवादी होते . मुस्लिमांना किती द्यायचे ? यावरून गांधीजी आणि सुभाष चंद्र बोसांमध्ये वाद झालेले आहेत दास पॅक्ट च्या वेळी याच कारणावरुन दोन्ही पक्षात वाजले होते. देशबंधू चित्तरंजन दास यांच्या दास पेक्ट नुसार तत्कालीन बंगाल मधील ५२% मुस्लिमाना ६०% जागा विधिमंडळात राखीव मिळणार होत्या . या कराराला गांधींचा विरोध तर सुभाषबाबूंचा पाठींबा होता. जातीय दंगली होऊ लागल्या, गांधीजींच्या तत्वांचा याहून मोठा पराभव नव्हता. दंगलग्रस्त भागांची पाहणी ते करत होते. लोक येऊन भेटत होते शिव्याशाप देत होते. गांधीजी सहन करत होते. "तुझा मुलगा मुसलमानांनी मारला तर एखादा मुसलमान मुलगा ज्याचे आईबाप हिंदूंनी मारले असतील त्याला जवळ घेऊन मोठा कर" हे गांधीवादी उत्तर लोकांना अव्यवहार्य वाटू लागलं. दांडी यात्रेतले गांधीजी आणि नौखालीतले पंधरा वर्षानंतरचे गांधीजी यात वाढलेल्या वयाबरोबर मानसिकतेचा सुद्धा फरक होता. हे गांधीजी पराभूत होते दीन होते, लोकाकांकडून आदर मिळूनसुद्धा नाकारले गेलेले होते. गांधीवाद भारताला तेंव्हाच सोडून गेला असता. पण तसं होण्यातलं नव्हतं. त्याला कारणीभूत होता पंडित, हुतात्मा (वगैरे वगैरे) नथुराम गोडसे. गांधीजींना मारायची गरजच नव्हती. त्यांचा पूर्ण पराभव झाला होता. देशभरात एकही मुसलमान टिकत नाही की काय अश्या महाभयानक दंगली झाल्या होत्या. अचानक गांधीजींची हत्या झाली आणि देशभर दंगली थांबल्या. मुसलमान जीवानिशी जाण्यापासून वाचले. म्हणूनच भारतभरातल्या मुसलमानांनी नथुराम गोडसेचे पिढ्यानपिढ्या आजन्म ऋणी राहायला हवं. नथुराम गोडसे काय किंवा अनेक हिंदुत्ववादी काय (त्यात सावरकरही आले) यांना अखंड भारत हवा होता. पण अखंड भारताबरोबर जे मुस्लिम लोकसंख्या येईल त्याचं काय याबद्दल त्यांच्याकडे उत्तर नव्हतं. आज अनेक हिंदुत्ववाद्यांना देशातले १४ टक्के मुसलमान पचत नाहीत. भारत पाकिस्तान आणि बांगलादेश मिळून आजच्या घडीला हि संख्या एक तृतीयांश झाली असतो. झेपलं असतं का या भारतभू म्हणजे पितृभू आणि पुण्यभू मानणाऱ्या लोकांना ? शिवाय एक तृतीयांश मुसलमान भारतात राहिले असते तर त्यांच्या दयेवर दोन तृतीयांश हिंदूंना जगावं लागलं असतं हे डॉ. आंबेडकरांनी त्यांच्या 'थॉट्स व पाकिस्तान' या पुस्तकात लिहून ठेवलंय. कारण मुसलमान ही यादेशातली गेली काही शतकं (मराठा साम्राज्याचा इतिहास वगळता) राज्यकर्ती जमात होती. गांधीजी आणि बाबासाहेबांच्या भिन्न विचारांमध्ये हा एक समान दुवा होता. गांधीजी काँग्रेसचे प्रमुख नेते झाले. मोहमद अली जिना काँग्रेस सोडून गेले. पुढे शौकत अली गेले. सर्वात शेवटी काँग्रेसमध्ये एकच मुसलमान शिल्लक राहिला तो म्हणजे मौलाना अबुल कलम (विद्यावाच्चस्पती) आझाद. यांना भारत अखंड हवा होता. पण कोणतीही किंमत देऊन. गांधींनी हा अपराध केला. मुसलमानांना त्यांचा देश तोडून दिला. हिंदूंना आपल्या भारतात ठेवलं. या बद्दल १५ ऑगस्ट १९४७ हा दिवस हिंदुत्ववादयांनी 'हिंदू स्वातंत्र्य दिवस' म्हणून साजरा करायला हवा. म्हणजेच मुसलमानांनी नथुराम गोडसेचं ऋणी राहायला हवं, हिंदुत्ववाद्यांनी गांधीजींचं ऋणी राहायला हवं आणि आजच्या समस्त गांधीवाद्यांनी नथुराम गोडसेचे आभार मानायला हवेत. त्याचा दोन ऑक्टोबर नथुरामला शिव्या घालण्यापासून सुरु होतो आणि हिंदुत्ववाद्यांच्या नावाने कडाकडा बोटं मोडण्यापर्यंत येऊन संपतो.

No comments:

Post a Comment